सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात आधूनमधून चांगला पाऊस पडत असून शेतकऱ्यांना बियाणे व खतांची आवश्यकता आहे. कुठलाही शेतकरी बियाणे व खतांपासून वंचित राहणार नाही यासाठी कृषी सेवा केंद्रांना शनिवार व रविवार घडण्यास परवानगी द्यावी, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्गाचा आढावा पालकमंत्री श्री. पाटील यांनी घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. बैठकीला गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गृह विलगीकरणामुळे कोरोनाचा प्रसार कुटुंबातच होत असल्याचे आढळून येत आहे. याला पर्याय म्हणून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना केंअर सेंटर्स सुरु करण्यात आले आहेत. रुग्ण बाधित आढळल्यानंतर त्याला लवकरात लवकर कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल करावे. तिसऱ्या लाटेत आरोग्य सुविधा कमी पडू नयेत म्हणून आत्तापासूनच तयारी करावी. शिक्षकांना त्यांच्याकडे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची बऱ्यापैकी माहिती असल्याने उपाययोजनेच्या या कामात त्यांचा सहभाग घ्यावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. पाटील यांनी या बैठकीत केल्या.
मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटचे काम सुरु आहे ते लवकरात लवकर पूर्ण करावे, अशा सूचना गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी बैठकीत केल्या.
जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीमध्ये सादर केला.
00000