सातारा (जिमाका) 2:- माण तालुक्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी माण तालुक्यात विविध गावांमध्ये सुरु करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांना आज भेटी देवून तिथल्या व्यवस्थेची पहाणी केली.
या पहाणी प्रसंगी प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसीलदार बाई माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
गृह विलगीकरणामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे जास्तीत जास्त रुग्ण संस्थात्मक विलगीरण कक्षात दाखल करावे. यासाठी प्रत्येक गावातील ग्रामदक्षता समितीने पुढाकार घ्यावा. विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या तपासणीसाठी उपकेंद्रातील डॅाक्टर, नर्स,आशा सेविका तसेच खाजगी डॅाक्टरांचा सहभाग घेण्यात यावा, असे सांगून जिल्हाधिकारी शेखर सिंह पुढे म्हणाले,आशा यांनी कोमॅार्बिड सर्वेक्षण काम नियमितपणे करावे त्यांची माहिती संबंधितांना तात्काळ द्यावी. गावपातळीवरील काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावा लक्ष केंद्रीत करुन कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी भेटी प्रसंगी दिल्या.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज माण तालुक्यातील म्हसवड, मार्डी, वावरहिरे, बिदाल या गावांमध्ये सुरु करण्यात आलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षांची पहाणी करुन तेथील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.