फलटण :
कोरानाचा वाढता कहर काही केल्या थांबेना म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. लॉकडाऊन म्हणजे निर्बंध तर आलेच. पण याचबरोबर शासनाने स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुसार निर्बंधात वाढ करण्याची मुभा देखील दिली. त्यानुसार फलटण तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या कमी करण्याच्या उद्देशाने मे महिन्याच्या दुसर्या दिवसापासून फलटण शहरासह तालुक्यातील काही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध पंधरा दिवस लागू ठेवण्यात आले. या पंधरा दिवसांच्या निर्बंधांनंतर तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत काही अंशी तरी घट होईल अशी अपेक्षा होती. मात्र असे काहीच झाले नाही. उलट रोजची रुग्णसंख्या तीनशे ते चारशे च्या घरातून मागे अजिबात सरकली नाही. आता गेल्या दोन दिवसांपासून तर ही आकडेवारी पाचशेच्या पुढे सरकली आहे. त्यामुळे या लॉकडाऊननी नक्की काय साधले? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला नाही तर नवलच.
जसे नाण्याला दोन बाजू असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट दोन परिणाम असतातच. लॉकडाऊनचा निर्णय घेताना कोरोनाच्या संक्रमणाला आळा बसेल. वाढती रुग्णसंख्या कमी होईल; धोका टळेल या चांगल्या परिणामांची अपेक्षा होती. पण फलटण तालुक्यात सध्या तरी ही अपेक्षा सपशेल फोल ठरत आहे. शासनाने निर्देशित केलेले लॉकडाऊनचे निर्बंध आधिक स्थानिक प्रशासनाने घातलेले प्रतिबंधित क्षेत्राचे निर्बंध यानंतरच्या कालावधीतील गत सात दिवसांतील फलटण तालुक्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी अनुक्रमे 240, 395, 494, 342, 332, 364, 515 अशी ‘वाढता वाढता वाढे’ आहे. तर दुसरीकडे मात्र लॉकडाऊनमुळे संभाव्य असणारे वाईट परिणाम मात्र दिवसेंदिवस गडद होत आहेत. लॉकडाऊनमुळे दैनंदिन व्यवहारांवर बंधने आली आहेत. छोटे उद्योग – व्यवसाय बंद आहेत. अर्थात याचा थेट परिणाम प्रत्येक घटकाच्या कमाईवर झाला आहे. त्यात वाढती महागाई तर प्रत्येकाच्या वाट्याला आहेच. अनेकांच्या उत्पन्नाला मोठी कात्री लागली आहे तर काहींचे उत्पन्न अक्षरश: शून्यावर आले आहे. पण घरभाडे, किराणा, गॅस सिलेंडर, शाळेच्या फी, लाईट बील, घरपट्टी, पाणीपट्टी, कर्जाचे हप्ते यातून मात्र कुणालाच सुटका नाहीए. त्यामुळे कोरोना संपू वा ना संपू; पण लॉकडाऊनच्या स्थितीमुळे रोजच्या कमाईवर पोट भरणारे सर्वसामान्य कमालीची आर्थिक कोंडी होऊन नक्कीच संपतील अशी विदारक परिस्थिती आहे. एकूणच फलटण तालुक्यातील लॉकडाऊनच्या तराजूत त्याच्या परिणामांना तोलले तर चांगल्या परिणामांच्या तुलनेत वाईट परिणामांचीच बाजू वजनदार ठरेल.
तालुक्यातील रुग्णसंख्या वाढीची आणि पर्यायाने लॉकडाऊनच्या अपरिणामकारकतेची कारणमिमांसा करायची झाली तर जनतेची बेफिकीरी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष हेच या परिस्थितीला जबाबदार आहे. लक्षणे दिसूनसुद्धा लवकर तपासणी न करणे, गृहविलगीकरणात असताना काटेकोर बंधने न पाळणे आणि यातून कुटूंबच्या कुटूंब बाधीत होणे ही बेफिकीरी अंगलट आल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे गृहविलगीकरणातील कोरोना बाधीतांवर लक्ष न ठेवणे, काटेकोरपणे काँटॅक्ट ट्रेसिंग न करणे, लसीकरण केंद्रांवर रोजच्या शेकडोंच्या संख्येने होणार्या गर्दीकडे कानाडोळा करणे, मास्क, सामाजिक अंतर न पाळणार्यांवर कारवाई टाळणे अशा प्रकारे प्रशासनाचे परिस्थितीकडे झालेले दुर्लक्षही सध्याच्या परिस्थितीस कारणीभूत आहे. विशेषत: तालुक्यातील ग्रामीण भागात वाढत्या रुग्णसंख्येला खतपाणी घालणारी आणि लॉकडाऊनच्या परिणामकारकतेला बाधक ठरणारी हीच प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे जोपर्यंत यामध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आपल्याला परिस्थिती सुधारण्याची, लॉकडाऊनच्या सकारात्मक परिणामांची केवळ प्रतिक्षाच करावी लागेल.
शेवटचा मुद्दा –
कोरोनाच्या संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेवून लोकप्रतिनिधी व नेते मंडळींच्या पुढाकाराने फलटण तालुक्यात कोरोना केअर सेंटर व विलगीकरण कक्षांच्या उभारणीने आता वेग घेतला आहे. विशेष म्हणजे या कार्याला लोकसहभागाची जोड मिळत आहे. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यामुळे या प्रयत्नांना यश यावे, वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागावा, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील व्हावेत, सर्वसामान्यांची आर्थिक ओढा-ताण थांबावी एवढीच तुर्तास प्रार्थना !
– रोहित वाकडे, संपादक, सा.लोकजागर.