फलटण :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत तो अनुभव खूप वाईट असून गेली महिनाभर संपूर्ण तालुकाभर लॉकडाऊन असताना देखील ग्रामीण भागातील रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही.
त्यामुळे आता ग्रामीण भागात अधिक लक्ष घालण्याची गरज असून ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यास कोरोना ची साखळी तोडण्यासाठी त्या रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा ) यांनी व्यक्त केले आहे.
श्रीमंत संजीवराजे (बाबा )पुढे म्हणतात की, आता ग्रामीण भागांमध्ये तहसील कार्यालय, पंचायत समिती, व ग्रामपंचायतीच्या मदतीने ठिकठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभे करण्यात आले असून याविलगीकरण कक्षाला अनेक ठिकाणांहून मदत केली जात आहे.
तरी या कक्षामध्ये कोव्हिड बाधित रुग्णांनी जाणे खूप महत्त्वाचे आहे. कारण कोव्हिड बाधित रुग्ण गृह विलगीकरणा मध्ये राहिला तर त्यांच्या घरातील व आसपासच्या लोकांना कोरोनाची बाधा होताना आढळून येत आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तुटली जात नाही. त्यामुळे गृहविलगीकरणाचा काहीही उपयोग होताना दिसत नाही.
त्यामुळे आता ग्रामीण भागातील जनतेने घरगुती उपचार न करता ताबडतोब जवळच्या विलगीकरण कक्षामध्ये भरती होणे गरजेचे असल्याचे ही मत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा ) यांनी शेवटी व्यक्त केले आहे.