1) ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना रविंद्र बेडकिहाळ. समवेत भिवा जगताप, अमर शेंडे, सौ.अलका बेडकिहाळ, रोहित वाकडे.
2) पोंभुर्ले (ता.देवगड) येथे ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करताना सरपंच सादीक डोंगरकर, अॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर, अशोक पाडावे.
फलटण, दि.17 : फलटण टुडे वृत्तसेवा
महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक व मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या येथील मुख्य कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कोवीड 19 च्या निर्बंधांमुळे साध्या पद्धतीने साजर्या झालेल्या या कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, अमर शेंडे, रोहित वाकडे, भारद्वाज बेडकिहाळ, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बेडकिहाळ म्हणाले, यावर्षी ‘दर्पण’कारांची शतकोत्तर अमृतमहोत्सवी पुण्यतिथी (175 वी) असल्याने यानिमित्त संपूर्ण वर्षभर विविध क्षेत्रातील मान्यवरांची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद कार्यक्रम राज्याच्या विविध भागात कोवीड-19 च्या परिस्थितीनुसार ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष समारंभपूर्वक आयोजित करण्यात येतील. तसेच महाराष्ट्राच्या हिरकमहोत्सवानिमित्त सलग 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वर्षे नियमितपणे प्रकाशित होणार्या वृत्तपत्रांचा व त्यांच्या विद्यमान संपादकांचा गौरव समारंभ व या सर्व वृत्तपत्रांची सचित्र माहिती असलेला ‘हिरक महोत्सवी महाराष्ट्र गौरव ग्रंथ’ प्रकाशन हे विशेष कार्यक्रम संपन्न करण्याचे नियोजित असल्याचेही, बेडकिहाळ यांनी स्पष्ट केले.
*पोंभुर्ले येथे अभिवादन*
दरवर्षी संस्थेच्यावतीने बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात पोंभुर्ले व जांभे देऊळवाडी ग्रामस्थ, पोंभुर्ले ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न होत असतो. मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम पोंभुर्ले ग्रामपंचायतीच्यावतीने साध्या पद्धतीने संपन्न झाला. यावेळी सरपंच सादीक डोंगरकर, महाराष्ट्र कर्जदार जामीनदार हक्क बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अॅॅड.प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर, अशोक पाडावे यांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.