सातारा दि. 17 (जिमाका): कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. या अंदाजानुसार लहान मुलांना तात्काळ आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी आत्तापासूनच नियोजन करा, अशा सूचना विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केल्या.
कै. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
15 ते 40 वयोगटात कोरोना बाधित अधिक प्रमाणात आढळत आहेत. यामध्ये ग्रामीण भागातील तरुण जास्त आहेत. त्यामुळे टेस्टींगचे आणखीन प्रमाण वाढाविले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांना तात्काळ उपचार मिळावे यासाठी वैद्यकीय सेवांचे विकेंद्रीकरण करा. तसेच एखाद्या रुग्णामुळे संपूर्ण कुटुंब बाधीत होत आहे यामुळे गृह विलगीकरणा पेक्षा संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचनाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आढावा बैठकीत केल्या.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे या बैठकीत दिली.
या बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश शिंदे यांनीही उपयुक्त अशा सूचना केल्या.