प्राथमिक शिक्षक समिती च्या सदस्यांकडून कोव्हिड योद्धा पुरस्कार स्वीकारताना गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे साहेब
फलटण (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
फलटण तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सन्माननीय श्री.रमेश गंबरे साहेब यांचा फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समिती यांच्याकडून कोव्हिड योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.
फलटण तालुक्यातील शिक्षण विभागाचा श्री.गंबरे साहेब यांनी डिसेंबर 2018 पासून चार्ज घेतला असून आत्तापर्यंत त्यांनी नवोदय परीक्षा, सैनिक स्कूल परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षामध्ये विशेष प्रयत्न करून अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. त्याचबरोबर शालेय क्रीडा स्पर्धामध्येही विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरावर जनरल चॅम्पियनशिप मिळवली आहे. तसेच शिक्षक सक्षमीकरण स्पर्धेमध्ये ही जनरल चॅम्पियनशिप मिळण्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. सध्या कोरोना परिस्थितीमुळे शाळा सुरू नसतानाही ऑनलाईन स्वाध्याय मध्येही फलटण तालुका अग्रेसर असल्याचा आपणास दिसून येतो.तसेच शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांनी शिक्षकांच्या अडीअडचणी संदर्भात ही अतिशय चांगल्या प्रकारची भूमिका बजावलेली आहे. आज अखेर मेडिकल प्रस्ताव पूर्ण, सेवा पुस्तक ऑनलाईन काम पूर्णत्वास आले आहे,31 मे अखेर सेवानिवृत्तीचे प्रस्तावही पूर्ण झाले आहेत. तसेच कोरोनामुळे निधन झालेल्या शिक्षकांचे आजपर्यंत ऑफिसला प्राप्त झालेले प्रस्ताव त्यांनी पुढे पाठवलेले आहेत.
श्री.रमेश गंबरे साहेब हे स्वतः फेब्रुवारी 2019 मध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले होते त्यामुळे स्वतःवर आलेली परिस्थिती आणि आजारपणात करावे लागणारी काळजी हे त्यांनी स्वतः अनुभवल्यामुळे ते आज जे शिक्षक बांधव किंवा त्यांचे कुटुंबातील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांना ते गटविकास अधिकारी डॉ. अमित गावडे मॅडम यांच्याद्वारे ते शक्य ती मदत करत असंताना दिसून येतात. गंबरे साहेब यांनी फलटण तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून कोरोना काळामध्ये भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.त्यांच्या आतापर्यंतच्या यशस्वी वाटचालीबद्दल व फलटण तालुक्यातील शैक्षणिक क्रांती बद्दल फलटण तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने त्यांना सन्मानित करत असताना शिक्षक समितीचे अध्यक्ष श्री.भगवंतराव कदम यांनी गंबरे साहेब यांचे अभिनंदन केले व आभार मानले. तसेच साहेब तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे काम करत आहात आणि इथून पुढेही अशाच प्रकारचे काम करून सर्व शिक्षक बांधवांचे अडचणीचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत असे मत मत व्यक्त केले. सत्काराला उत्तर देत असताना श्री.गंबरे साहेब म्हणाले,की फलटण तालुक्यातील सर्व शिक्षक बांधवांच्या सहकार्याने तसेच मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर मा.अध्यक्ष जि.प.सातारा, मा.श्री. दिपकराव चव्हाण आमदार साहेब, फलटण पंचायत समितीचे सभापती मा. श्रीमंत शिवरूपराजे निंबाळकर-खर्डेकर,उपसभापती मा.रेखाताई खरात मॅडम व गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शिक्षकांना व विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम आत्तापर्यंत करत आलो आहे आणि इथून पुढेही करत राहील असे सांगितले.यावेळेस फलटण तालुका शिक्षक समितीचे सरचिटणीस श्री.गणेश तांबे प्रसिद्धीप्रमुख निलेश कर्वे, ज्येष्ठ नेते राजेंद्र पवार ,तानाजी सस्ते अनिल चव्हाण हे उपस्थित होते.