दत्तघाट व परिसराची नगरपालिकेकडून डागडुजी

फलटण : 
शहरातील दशक्रिया विधी करण्यासाठी वापरात येणाऱ्या दत्तघाट परिसरात नगरपालिकेने डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या आदेशानुसार ही डागडुजी करण्यात येत असून आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ.नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे यांनी दिली आहे.
माजी नगराध्यक्ष व विद्यमान सदस्य पांडुरंग गुंजवटे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला बसला आहे. सातारा जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यात अग्रभागी असल्याची नोंद झाली आहे. परिणामी फलटण तालुक्यातही मृत्यूदर वाढला आहे.
यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी विशेषतः दशक्रिया विधी करण्यासाठी शहरात येथे असणाऱ्या दत्तघाट परिसरात असणारी सध्याची जागा अपुरी पडत आहे. म्हणूनच दत्तघाट परिसराची डागडुजी करण्यासाठी फलटण नगरपालिकेकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांची विविध कामे करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यात ओटे बांधणे, रंगकाम करणे, हौद बांधणे ही कामे पूर्ण झाली असून पत्रा बसवणे, संरक्षक भिंत बांधणे ही कामेही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहेत. 
दरम्यान, करोना महामारीच्या काळात नागरिकांसाठी शक्य तितके सर्वकाही करण्याचे प्रयत्न फलटण नगरपालिका करत असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!