ग्रामीण भागात आता कोरोना संसर्ग अधिक असल्यामुळे तिथे कोरोना केअर सेंटरची गरज – सभापती रामराजे नाईक निंबाळकर

 

सातारा दि. 13 (जिमाका) : 

महाराष्ट्रात शहरी भागापेक्षा आता ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागात गृह विलगीकरणात असलेले रुग्ण जागेअभावी त्यांच्याकडून नियम पाळले जात नाहीत. ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रामीण भागात कोरोना केअर सेंटरची संख्या वाढवावी, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज सांगितले.

              गोंदवले बु. येथील चैतन्य कोविड सेंटरचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (ऑन लाईन), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार जयकुमार गोरे, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी, तहसिलदार बाई माने, अनिल देसाई यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

            कोरोनाच्या संकटात वैद्यकीय सेवेचे विकेंद्रीकरण केले पाहिजे. यातुन आणखी आरोग्य सुविधा वाढविल्या पाहिजेत. यापुढे कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी शरथीचे प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता शासन, प्रशासनाला साथ द्या. तुमच्यासाठी माण येथील आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी गोंदवले महाराज ट्रस्टने मोठी जबाबदारी स्विकारली पाहिजे. याला शासन पूर्णपणे मदत करेल असे आश्वासनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिले.

            गोंदवले बु. येथे सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये 30 ऑक्सिजन बेड आणि 100 साधे बेड असणार आहेत. त्याचबरोबर कोरोना केअर सेंटरसाठी मदत करणाऱ्या संस्थांचे विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी अभिनंदन केले.

            या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री म्हणाले, राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी-अधिक आढळत आहे. यामध्ये माण खटावमध्येही कोरोना रुग्ण मोठ्या  प्रमाणात आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर  माण तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता एखादे कोरोना केअर सेंटर असावे अशी इथल्या नागरिकांची मागणी होती.  हे कोरोना केअर सेंटर जिल्हा प्रशासन गोंदवले महाराज ट्रस्टच्या सहकार्यातुन उभे करण्यात आले आहे.  काही नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे असले तरी ते डॉक्टरांकडे जात नाहीत, आजार गंभीर झाल्यानंतर ते डॉक्टरांकडे उपचारासाठी दाखल होतात. असे न करता लक्षणे दिसताच तात्काळ डॉक्टरांचा उपचार घ्यावा. ज्या कुटुंबामध्ये कोरोना बाधित रुग्ण आहेत. अशा कुटुंबातील व्यक्तींनी घराबाहेर पडु नये. शासनाने लॉकडाऊन वाढविला आहे. या लॉकडाऊनमध्ये जे निर्बंध घातले आहेत त्याचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. तसेच नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षीत अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे, असे आवाहनही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेवटी केले.

                                                                              

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!