जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
विद्या प्रतिष्ठानचे कमलनयन बजाज अभियांत्रिकी महाविद्यालयाने एआयसीटीई व आयएसटीई मान्यताप्राप्त “Innovative Teaching-Learning Methods” या सात दिवसीय रिफ्रेशर कार्यशाळांच्या मालिकेतील तिसऱ्या कार्यशाळेचे आयोजन ६ मे ते १२ मे २०२१ दरम्यान केले आहे. या कार्यशाळेत महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, दिल्ली, गोवा, गुजरात, हरियाणा, ओरिसा, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश या राज्यांतील तांत्रिक तथा इतर महाविद्यालयातील शंभर प्राध्यापकांचा सहभाग आहे. झुंम या प्रणालीवर आयोजित या कार्यशाळेत आयआयटी, सीओईपी तसेच दर्जेदार तांत्रिक संस्था व विद्यापीठातील नामवंत शास्त्रज्ञ, कुलगुरू व तज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे. उद्घाटन समारंभादरम्यान संयोजक डॉ. अनिल हिवरेकर यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला. प्राचार्य डॉ. राजनकुमार बिचकर यांनी ह्या कोरोना महामारीच्या काळातील कल्पक शिक्षण पद्धतीचे महत्व विषद केले. प्रमुख पाहुणे आयएसटीई चे पदाधिकारी डॉ. रणजित सावंत यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेबद्दल शुभेच्छा दिल्या व शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. तसेच तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेल्या बदलाला अनुसरून अभियांत्रिकी संस्थांनी आपल्या अध्यापन पद्धतीत अमुलाग्र बदलासाठी आग्रही राहण्याचे आवाहन केले. प्रा. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन प्रा. गौरी भोईटे यांनी मानले.
संस्थेचे उपाध्यक्ष श्री अशोक प्रभुणे, विश्वस्त सौ सुनेत्रा पवार, अॅड नीलिमा गुजर यांच्या मार्गदर्शनात सहसंयोजक प्रा. दीपक सोनवणे, प्रा. अनिल दिसले, डॉ. अपर्णा सज्जन, डॉ. नितीन जाधव व प्रा. निलेश पांढरे हे ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.