फलटण :
कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजाराचे योग्य निदान आणि तज्ञ डॉक्टरांकडून योग्य औषधोपचार या बाबी सांभाळण्यात महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबली हॉस्पिटल संचलित लाईफ लाइन हॉस्पिटलने चांगले काम केल्याचे नमूद करीत आता त्यांच्या मदतीला अत्याधुनिक सी टी स्कॅन मशीन उपलब्ध झाल्याने हॉस्पिटल अधिक गतिमान होईल, असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी व्यक्त केला आहे.
हिताची (जपान) कंपनीच्या १२८ स्लाइस या दररोज सुमारे २०० रुग्णांचे सी टी स्कॅन क्षमता असलेल्या सुमारे २.५ कोटी रुपये किमतीच्या या भागातील पहिल्या अत्याधुनिक मशिनची पूजा व औपचारिक उदघाटन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), डॉ.संजय राऊत, डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य, डॉ.सौ.मेघना बर्वे, डॉ.सागर गांधी, डॉ.सौ.सुनिता उमेश निंबाळकर, हिताची कंपनीचे डिस्टीब्युटर श्री.योगेश भोसले यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.
संस्थान कालीन महाराजा मालोजीराव सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल संचलित लाईफ लाइन हॉस्पिटलच्या माध्यमातून अत्याधुनिक साधने सुविधा आणि तज्ञ डॉक्टर्सच्या माध्यमातून एक सुसज्ज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून कार्यान्वित होत असताना इमारत विस्तार, नवीन अत्याधुनिक मशिनरी, साधने सुविधांमुळे फलटण करांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधांची अडचण राहिली नसल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी स्पष्ट केले आहे.
प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य यांनी प्रास्ताविकात हॉस्पिटल मध्ये फिलिप्स कंपनीचे ३ टेसला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले एम आर आय मशीन, ऍन्जिओग्राफी/एन्जोओप्लास्टी करण्यासाठी उत्तम दर्जाचे कॅथलॅब युनिट, ७ डायलिसीस मशीन, टूडीइको मशीन, स्ट्रेस टेस्ट सुविधा, हृदय रुग्णांसाठी उपयुक्त असलेले व्होल्टर मॉनिटर मशिन्स, बी पी मॉनिटर सह व्हेटींलेटर, बायपॅप मशिन व एच एफ एन ओ इत्यादी सुविधा देणारे १६ बेड आयसीयू युनिट, तसेच अँबुलन्स व्हॅन, कार्डीक अँबुलन्स सारख्या साधने सुविधांसह ५० बेडचे सुसज्ज हॉस्पिटल कार्यान्वित असून भविष्यात विस्ताराची योजना असल्याचे डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य यांनी निदर्शनास आणून दिले.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), आ.दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे मार्गदर्शन व सहकार्याने हॉस्पिटल चालविताना कोणतीच अडचण येत नसल्याचे डॉ.पार्श्वनाथ राजवैद्य यांनी स्पष्ट केले.