लोणंद :
शनिवार, दिनांक २४ एप्रिल २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री ना.शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, दत्तानाना ढमाळ, डॉ.नितीन सावंत आणि खंडाळा तालुक्यातील मान्यवर यांच्या उपस्थितीत लोणंद एमआयडीसी मध्ये सोना अलॉइज या कंपनीमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला.
कोरोनाने घातलेल्या थैमानाच्या काळात गेल्या काही दिवसापासून बंद पडलेल्या परंतु ना.रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या पुढाकाराने लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीत दररोज तयार होणारा सुमारे दीड ते दोन हजार सिलेंडर ऑक्सिजन पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांना संजीवनी ठरणार आहे.
गेली आठ दहा वर्षापासून शेकडो हातांना काम देणारी सोना कंपनी कामगारांच्या संपामुळे व आर्थिक मंदीमुळे बंद पडली होती, त्यामुळे बंद पडलेली सोना कंपनीच आता शेकडो रुग्णांचा ऑक्सिजनच्या रुपाने आधार बनली आहे. सोना कंपनीतून दररोज सुमारे १८०० सिलेंडर ऑक्सिजन तयार केला जाऊन रुग्णांपर्यत पोहचविला जाणार आहे. सोना अलॉईज लोणंदला आणणारे ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) हे मृत्यूच्या महामारीत जीवनदाते ठरणार आहेत.
दुष्काळी म्हणून गेल्या काही वर्षांपूर्वी ओळखला जाणारा खंडाळा तालुका हरितक्रांती व औद्योगिक क्रांतीचे स्वप्न सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी पाहिले होते. ना.श्रीमंत रामराजे यांनी पाणी व कारखाने यासाठीच काम करुन निरा-देवघर, धोम-बलकवडीचे पाणी खंडाळा तालुक्याच्या माळरानावर नेऊन उजाड माळरान हिरवीगार केली. कवडीमोल दराच्या जमिनीला कोटीचा दाम आणण्याचे कामही ना.श्रीमंत रामराजे यांच्या संकल्पनेतील लोणंद, शिरवळ, खंडाळा औद्योगिक वसाहत (एमआयडीसी), केसुर्डीत विशेष आर्थिक क्षेत्रची (एसईझेड) निर्मिती करुन मोठंमोठाल्या कंपन्या आणून हजारो बेरोजगारांच्या हाताला काम दिले.
दहा वर्षांपूर्वी ना.श्रीमंत रामराजे यांच्याच पुढाकाराने लोणंद येथील एमआयडीसी मध्ये सोना अलॉईज ही लोखंड निर्माण करणारी कंपनी आणली गेली. या कंपनीच्या माध्यमातून शेकडो युवकांच्या हाताला काम मिळाले तर लोणंद गावातील बाजारपेठ सह अन्य सर्व बाबींवर त्याचा चांगला परिणाम होऊन मोठी आर्थिक उलाढाल वाढली होती. सोना कंपनी लोणंदची आर्थिक वाहिनी बनली होती. या कंपनीचा प्रदूषणाचा काही प्रमाणात त्रास होत होता. परंतु, हजारो लोकांना मिळणारा रोजगार ही जमेची बाजू ठरत होती.
काही वर्ष सोना कंपनी चांगली चालल्यानंतर काही जणांच्या राजकीय हस्तक्षेपामुळे कामगार युनियचे फॅड आले. त्याचा परिणाम कंपनीला टाळे लावण्यापर्यत गेला. ना.श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून हजारो घरात पेटवलेल्या चुलीत पाणी ओतण्याचे काम काही स्वार्थी लोकांनी केले. कामगारांच्या संपा बरोबरच जागतिक आर्थिक मंदीमुळे कंपनी दोन वर्षांपासून बंद पडली होती. कंपनी पुन्हा सुरु होण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे यांचे सर्वच स्तरावर प्रयत्न सुरु होते.
कोरोनाचा कहर वाढलेला असताना कमी पडत असणारा ऑक्सिजन सोना कंपनीत तयार होऊ शकतो याची माहिती असल्यानेच ना.श्रीमंत रामराजे यांच्याच पुढाकाराने ऑक्सिजनची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला गेला, आणि सोना कंपनीत दररोज सुमारे दीड ते दोन हजार सिलेंडर ऑक्सिजन तयार करण्यास सुरुवात झाली आहे. या सिलेंडरचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रात केला जाणार आहे. त्यामुळे सोना कंपनी लाखो कोरोना रुग्णांना संजीवनी ठरणार आहे. याचे संपूर्ण श्रेय ना.श्रीमंत रामराजे आणि कंपनी प्रशासनाला जात आहे. एके काळी हजारो हाताना काम देणारी सोना कंपनी आता हजारो , लाखो रुग्णांना जीवदान देणार आहे.