बारामती :
बनावट रेमडीसीव्हिर बनवणाऱ्या टोळीचा बारामती पोलिसांकडून पर्दाफाश..
रेमीडीसीवरच्या इंजेक्शनसाठी संपूर्ण राज्यभरात अनेक जण हातापाया पडत असताना दुसरीकडे या संकटाची गैरफायदा घेत गोरखधंदा करत होते. बारामतीतील चौघेजण पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी करून रेमीडिसीवीरच्या मोकळ्या कुपीत भरून ते फेविक्विकच्या साह्याने पुन्हा बंद करत होते आणि विकत होते. बारामती तालुका पोलिसांनी अत्यंत सावधपणे सापळा रचून चौघांना पकडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच बनावट रेमीडिसिवर इंजेक्शन्स बाजारात असल्याबद्दल अधिकाऱ्यांना सांगितले होते.
या प्रकरणी तालुका पोलिसांनी भवानीनगर येथील प्रशांत सिद्धेश्वर घरत (वय 23 वर्ष) शंकर दादा भिसे (वय 22 वर्षे, रा. काटेवाडी ता. बारामती) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन इंजेक्शन काल रात्री घेतली होती. त्या दोघांकडे चौकशी केल्यानंतर दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी) हा तिसरा यातील आरोपी आढळून आला. हा मुख्य सूत्रधार आहे. भिगवण येथील संदिप संजय गायकवाड हा चौथा आरोपी असून या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
900 रुपयांचे असलेले रेमीडीसीवर इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकले जात होते. याची माहिती मिळताच एका दवाखान्यातील कर्मचाऱ्यांसह चार जणांची टोळी या गोरख धंद्यासाठी पुढे सरसावली. दवाखान्यातील एक कर्मचारी रेमेडीसीवीर वापरून झाल्यानंतर त्या मोकळ्या कुपीमध्ये पॅरासिटॅमॉल गोळ्यांचे पाणी भरून त्याला फेविक्विक लावून त्या बाटल्या पुन्हा बाजारात आणून विकत होता.
बारामतीतील एका रुग्णाच्या नातेवाईकांना इंजेक्शनच्या आवश्यकता होती त्यामुळे सतत संपर्क साधताना टोळीतील एका ची माहिती मिळाली त्यानुसार आठवणीतील एकाने इंजेक्शनची किंमत पस्तीस हजार रुपयाचे असल्याचे सांगितले.
दरम्यान या औषधांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्याने पोलिसांनी यावर लक्ष ठेवले. काल रात्री शहरातील फलटण चौकात इंजेक्शन घेण्यासाठी या टोळीतील एका जणाला बोलल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला व तो युवक आल्यानंतर प्रत्येकी इंजेक्शन 35 हजार रुपयांप्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतल्यानंतर पोलिसांनी या युवकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर हा विकृत धंदा समोर आला.
दरम्यान आज उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश विधाते यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक विजय नांगरे यांना या संदर्भात माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे या घटनेत एक फॉर्च्युनर गाडी देखील जप्त करण्यात आली असून राज्यातील ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्य सूत्रधार संदीप संजय गायकवाड हा रिकाम्या रेमेडीसीवीर कुपी आणून दिलीप गायकवाड याच्याकडे द्यायचा आणि दिलीप गायकवाड यामध्ये औषध भरून प्रशांत आणि शंकर हे दोघेजण सप्लाय करायचे. या इंजेक्शनची 35 हजार रुपये किंमत त्यांनी ठरवली होती. दरम्यान या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम तसेच औषधे व सौंदर्यप्रसाधन कायदा, औषधे किंमत अधिनियम आणि कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
असा सुरू होता गोरखधंदा
बारामती शहरातील फलटण चौकात रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी संबंधित युवकाने बोलावल्यानंतर सापळा लावून तालुका पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. एक इंजेक्शन 35 हजार या प्रमाणे दोन इंजेक्शनचे 70 हजार रुपये घेतले गेले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतल्यानंतर एका दवाखान्यातील कर्मचारी रिकाम्या झालेल्या रेमडेसिवीरच्या मोकळया बाटल्या आणून त्यात सिरींजने पॅरासिटामॉल मिसळून पुन्हा फेव्हिक्विकच्या मदतीने या बाटल्या बंद करुन पुन्हा त्या बाजारात नव्या म्हणून काळ्या बाजारात जादा दराने विक्री करण्याचा हा गोरखधंदा सुरु होता.
उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरासह तालुक्यात देखील रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याची खबर बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याचा मिळाली होती. त्यासाठी खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचत काळाबाजर करणाऱ्या आरोपींशी संपर्क साधण्यात आला. यावेळी आरोपीने ३५ हजार रूपयांना एक इंजेक्शन मिळेल. तुम्ही पेन्सिल चौकामध्ये या, असे सांगितले. यावेळी बारामती ग्रामीण पोलिसांनी पेन्सिल चौकात सापळा रचला ठरल्या वेळेप्रमाणे रात्री साडेबाराच्या दरम्यान आरोपी प्रशांत घरत व शंकर भिसे पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्यूनर कार (एमएच ४३, एमव्ही, ९६९६) मधून आलेल्या आरोपींची व खबऱ्याची भेट झाली. प्रसंगावधान दाखवत पोलिसांनी तातडीने चार आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान, कोविड सेंटरमध्ये सफाई कार्मचारी म्हणून काम करीत असलेल्या अवघ्य २२ वर्षाचा संंदिप गायकवाड हा मोकळ््या झालेल्या रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून मुख्य सुत्रधार दिलीप गायकवाड याच्याकडे देत होता. या बदल्यात संदिपला १० ते १२ हजार रूपये दिले जात होते. सिरिंजच्या सहाय्याने या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमॉल भरून अवघ्या दहा ते पंधरा रूपयात ही बनावट रेमडेसिव्हीर तयार करून ३५ हजार रूपयांना एक या प्रमाणे काळया बाजाराने विकले जात होते. तसेच रेमडीसीव्हीरच्या मागणीसाठी कोणी संपर्क साधला तर इंजेक्शन पोहचवण्याची जबाबदारी प्रशांत घरत व शंकर भिसे यांच्यावर होती. आतापर्यंत या रॅकेटमध्ये चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणखी यामध्ये कोण सहभागी आहे का याबाबत चौकशी सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या रॅकेटच्या माध्यमातून नविन माहिती समोर येणार आहे. आरोपींवर जीवनावश्यक वस्तू अधिनियमन कायदा, औषधे व सौदर्यप्रसाधने कायदा, औषध किंमत नियंत्रण कायद्यन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईबद्दल ग्रामीण पोलिस अधिक्षकांच्या वतीने बारामती ग्रामीण पोलिस ठाण्याला २५ हजाराचे बक्षिस जाहिर करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलिस निरिक्षक महेश ढवाण, हवालदार आर. जे. जाधव, आर. एस. भोसले, डी. एन. दराडे, निखिल जाधव आदींनी सहभाग घेतला.