फलटण दि.१४ :
गुढीपाडवा व नव वर्ष शुभारंभ दिनी फलटण नगर परिषदेने रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा उपलब्ध करुन देवून एक चांगली भेट फलटण वासीयांना दिली असल्याबद्दल समाधान व्यक्त करीत सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी नगर परिषदेस धन्यवाद दिले आहेत.
महाराष्ट्र शासन निर्णयानुसार १४ व्या वित्त आयोग निधीतून सुमारे ३५ लाख रुपये खर्च करुन खरेदी केलेल्या फोर्स कंपनीच्या रुग्णवाहिका व शववाहिका या दोन नवीन वाहनांचे पूजन व लोकार्पण श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक संपन्न झाले, त्यावेळी फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन व विद्यमान नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, नगर परिषद आरोग्य समिती सभापती सनी संजय अहिवळे, पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती अँड.सौ.मधुबाला भोसले, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ.वैशालीताई चोरमले, श्रीमती रंजनाताई कुंभार, सौ.प्रगतीताई कापसे, सौ.वैशालीताई अहिवळे, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले, राहुल निंबाळकर, मुख्याधिकारी प्रसाद काटकर व त्यांचे सहकारी अधिकारी कर्मचारी, शहरवासीय नागरिक उपस्थित होते.
फलटण नगर परिषदेने गेल्या २०/२५ वर्षात महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली सतत लोकहिताला प्राधान्य देत शहरवासीयांच्या गरजा ओळखून विविध नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचे स्पष्ट करीत त्यामध्ये प्रमुख्याने शहर पाणी पुरवठा योजना ४ था व ५ वा टप्पा, अतिक्रमण पुनर्वसन योजनेतील प्रशस्त शॉपिंग सेंटर्स, त्याशिवाय शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेली शॉपिंग सेंटर्स, पोहोण्याचा तलाव, सांस्कृतिक भवन विस्तार इमारत, भुयारी गटार योजना, कोविड रुग्णांसाठी आरोग्य सुविधा साधने आणि आता सुसज्ज रुग्णवाहिका व शववाहिका उपलब्ध करुन दिल्याचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी निदर्शनास आणून दिले.
या दोन्ही सुविधा शहर वासीयासाठी निश्चित कायम स्वरुपी उपयुक्त ठरणाऱ्या असल्याचे नमूद करीत सध्याच्या वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर ही दोन्ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरतील असे सांगून त्यापैकी रुग्णवाहिका सुविधा ना नफा ना तोटा तत्वावर आणि शववाहिका सुविधा मोफत उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सांगितले.
ऑगस्ट २०१५ मधील शासन निर्णयानुसार १४ व्या वित्त आयोग निधीतून दि.११ सप्टेंबर २०२० रोजी नगर परिषद सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार रुग्णवाहिका व शववाहिका खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार १७ लाख ३१ हजार ९०४ रुपये रुग्णवाहिका आणि १७ लाख ३४ हजार ५१७ रुपये खर्च करुन शववाहिका खरेदी करण्यात आल्याचे आरोग्य समिती सभापती सनी संजय अहिवळे यांनी सांगितले.
फलटण शहर वासीयांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नगर परिषद प्रा.शाळा नंबर १ (व्यंकटेश विद्यालय), शंकर मार्केट येथे उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये नागरी आरोग्य सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या इमारतीचा विस्तार करण्यात येत असून तेथे अधिक आरोग्य सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी तथा या नागरी आरोग्य सुविधा केंद रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष प्रसाद काटकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
या रुग्णालयासाठी एमबीबीएस डॉक्टर्सची दोन पदे मंजूर असून त्यापैकी एक पद रिक्त आहे, प्रयोग शाळा १, जीएनएम २, एएनएम ६, आशा सेविका २१, अंगणवाडी सेविका ११, मदतनीस ११ पदे मंजूर असून त्यापैकी १ डॉक्टर व ३ आशा सेविका पदे रिक्त असल्याचे सांगून विविध वैद्यकीय साधने सुविधा येथे उपलब्ध आहेत, आणखी आवश्यक साधने सुविधा उपलब्ध करुन देऊन फलटण वासीयांना दर्जेदार वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्याधिकारी तथा रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष प्रसाद काटकर यांनी सांगितले आहे.
रुग्णकल्याण समितीला आवश्यक औषधे, गोळ्या व वैद्यकीय साधने खरेदीसाठी १ लाख ७५ हजार रुपयांचे शासन अनुदान उपलब्ध असून नगर पालिका फ़ंडातून उर्वरित निधी उपलब्ध होणार असल्याचे मुख्याधिकारी तथा रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष प्रसाद काटकर यांनी सांगितले.
वास्तविक सुमारे ६० हजार शहराची लोकवस्ती आणि शेजारच्या जाधववाडी, कोळकी, फरांदवाडी, ठाकुरकी येथून जवळपास तेवढेच लोक शहरात येत असतात म्हणजे सुमारे दीड पावणे दोन लाख लोकवस्तीच्या या शहरातील सदरच्या रुग्णालयात आयसीयू सह आंतररुग्ण विभाग सुरु करण्याची मागणी होत असल्याचे मुख्याधिकारी तथा रुग्णकल्याण समितीचे अध्यक्ष प्रसाद काटकर यांच्या निदर्शनास आणून दिले असता त्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
प्रारंभी मान्यवरांचे शुभहस्ते दोन्ही वाहनांचे पूजन झाल्यानंतर श्रीफळ वाढवून या नवीन सेवांचा शुभारंभ करण्यात आला.