शहराचे आरोग्यासाठी भुयारी गटार योजना उपयुक्त, काही काळ रस्त्याच्या दुरावस्थेचा त्रास सहन केल्याबद्दल नागरिकांना धन्यवाद : श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब)

 

      फलटण (प्रतिनिधी) : फलटण शहरातील महत्वाकांक्षी भुयारी गटार योजनेचे काम संपूर्ण शहरात सुरु असल्याने अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याने गेले काही दिवस शहरवासीयांना त्रास सहन करावा लागला याची आपल्याला जाणीव आहे, तथापी योजना पूर्ण झाल्यानंतर शहरातील आरोग्य उत्तम राखण्यासाठी वेगळे काही करावे लागणार नसल्याची नोंद घेऊन शहरवासीयांनी काही काळ त्रास सहन केल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी शहरवासीयांना धन्यवाद दिले आहेत.
      फलटण शहरातील रस्त्यांसाठी राज्य शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सुमारे १२ कोटी रुपयाचे अनुदान मंजूर करण्यात आले असून त्यातून शहरातील ६७ रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत, त्याचा शुभारंभ डी.एड.कॉलेज चौक, फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या शुभहस्ते समारंभपूर्वक करण्यात आला, अध्यक्षस्थानी आ.दिपकराव चव्हाण साहेब उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), सार्वजनिक बांधकाम समिती सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब), नगराध्यक्षा सौ.निताताई नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, सार्वजनिक बांधकाम विभाग, फलटण सहाय्यक अभियंता महेश नामदे, शहर अभियंता (बांधकाम) पंढरीनाथ साठे, मा.सभापती दत्तात्रय गुंजवटे, पाणी पुरवठा समिती सभापती सौ.मधुबाला भोसले, आरोग्य समिती सभापती सौ.सनी अहिवळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती रंजना कुंभार, महिला व बालकल्याण समिती उपसभापती सौ.दिपाली निंबाळकर, सौ.प्रगती कापसे, सौ.जोत्सना शिरतोडे, नगरसेवक अजय माळवे, असिफ मेटकरी, सुधीर अहिवळे, दादासाहेब चोरमले, राहुलभैय्या निंबाळकर, सगुणामाता कन्स्ट्रक्शनचे यशवंत पाटील व दिलीपराव शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
      भुयारी गटार योजनेच्या या कामामुळे शहरातील अनेक रस्ते उखडले असले तरी ते पूर्ववत करण्यासाठी आपण शासनाचे विशेष अनुदान यापूर्वीच मंजूर करुन घेतले असल्याने आगामी काळात शहरातील सर्व रस्ते पूर्ववत करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याने उद्या पासूनच रस्त्यांच्या डांबरीकरण कामाला सुरुवात होत असून ज्या भागातील भुयारी गटाराचे काम पूर्ण झाले आहे, त्या भागातून रस्ते डांबरीकरण कामाची सुरुवात अगदी उद्यापासून होत असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी निदर्शनास आणून दिले.
      आपण या शहराचे नगराध्यक्ष म्हणून सन १९९१ ते १९९५ या कालावधीत जबाबदारी सांभाळली त्यावेळी शहरातील स्वच्छतेला प्राधान्य देऊन कामाला सुरुवात केली त्यावेळी वाढत्या लोकवस्तीचा विचार करता शहर पाणी पुरवठा योजनेचा विस्तार, अतिक्रमण पुनर्वसन योजना, शहरात वाहन तळ उपलब्ध करुन देणे, शहरातील बागांच्यामध्ये सुधारणा आणि नवीन बागांची उभारणी, सांस्कृतिक भवन नूतनीकरण, वीज वाहिन्या भूमीगत टाकणे वगैरे काही बाबी आपल्या विचाराधीन होत्या मात्र त्यासाठी पुरेसा निधी नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने आपण प्राधान्याने नगर परिषदेच्या जकात उत्पन्नात भरीव वाढ करण्याला प्राधान्य दिले, त्यासाठी जकात वसूली ठेकेदारामार्फत करण्याची संकल्पना स्विकारुन त्या उत्पन्नात भरीव वाढ होत असताना शासनाने जकात बंदीचा निर्णय घेतला आणि जकात उत्पन्ना इतके शासन अनुदान सुरु केल्याने नगर परिषद उत्पन्नात नागरिकांवर कसलाही बोजा न पडता भरीव वाढ करणे सहज शक्य झाल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी निदर्शनास आणून दिले.
      सन १९९५ मध्ये विधानसभेवर निवडून गेल्यानंतर कामाची चांगली संधी लाभली त्याबरोबर टप्प्याटप्प्याने राज्य मंत्री, कॅबिनेट मंत्री, पालक मंत्री, सभापती वगैरे सत्तेची पदे मिळत गेली, त्यातून निधीच्या उपलब्धतेचे मार्ग सापडत गेल्याने आपण शहरातील प्रश्नांबरोबर तालुक्याच्या प्रश्नांची सोडवणूक करताना शेतीच्या पाण्याचा, प्रश्न, औद्योगिक वसाहत, तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न वगैरे सोडवत असताना शहरातील पाणी पुरवठा योजना टप्पा ४ व ५, शहरातील अतिक्रमण पुनर्वसन योजना, बागांची उभारणी, पोहोण्याचा तलाव, सांस्कृतिक भवनाच्या शेजारी आणखी एक प्रशस्त इमारत, शहरातील रस्त्यांची सुधारणा, दुकान गाळ्यांची उभारणी, नगर परिषद प्रशस्त कार्यालय इमारत उभारणी, वीज वाहिन्या भूमीगत टाकणे वगैरे कामे केली आहेत. आपल्या संकल्पनेतील भुयारी गटार योजना पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून ८५ कोटी रुपये मंजूर करुन घेऊन आज शहरात हे काम अंतीम टप्प्यात सुरु आहे, ते पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणारी ही योजना सर्वांनाच आवश्यक असल्याची खात्री पटेल तथापी त्यासाठी काही दिवस त्रास सहन करावा लागल्याचे आपण मान्य करतो परंतू अंतीमतः ही योजना उपयुक्त ठरणारी आहे, ३/४ महिन्यात ती प्रत्यक्ष सुरु होईल याची ग्वाही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी दिली.
      प्रारंभी नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचे सत्कार केल्यानंतर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी प्रास्ताविकात शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मंजूर निधी व हाती घेण्यात येत असलेल्या रस्त्यांविषयी माहिती दिली. आ.दिपकराव चव्हाण साहेब व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या शुभहस्ते विधीवत भुमिपूजन झाल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून शहरातील ६७ रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिक, बंधू भगिनी व युवक वर्ग उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!