फलटण दि.१३ : महाराष्ट्रात कोरोना वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनी शासन/प्रशासनाने केलेल्या सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करावी, ६० वर्षावरील स्त्री-पुरुष तसेच मधुमेह, रक्तदाब किंवा तत्सम आजार असणाऱ्या ४५ वर्षावरील स्त्री-पुरुषांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले आहे.
उप जिल्हा रुग्णालय, फलटण येथे आज (शनिवार) आ.दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), नगराध्यक्षा सौ.निताताई मिलिंद नेवसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष श्री.मिलिंद नेवसे, डॉ.सौ.सुचिता शेंडे, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.महादेव माने वगैरेंनी लसीकरण करुन घेतले. तसेच जेष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर (ताईसाहेब) यांनी डॉ.रविंद्र सोनवणे यांच्या चिरजीवन हॉस्पिटल, रिंग रोड, फलटण येथे लसीकरण करुन घेतले.
फलटण शहरात उप जिल्हा रुग्णालय, नगर परिषद नागरी आरोग्य सुविधा केंद्र, शंकर मार्केट येथे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व प्रा.आरोग्य केंद्रांमध्ये लसीकरण सुविधा उपलब्ध असून आपले आधार कार्ड सोबत घेऊन जाऊन सर्व ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षावरील रक्तदाब, मधुमेह वगैरे आजार असणाऱ्या नागरिक यांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी केले आहे.
लसीकरण झाले तरी लगेच कोरोना धोका टळणार नाही, २८ दिवसानंतर दुसरा डोस प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे सांगून सर्वांनी मास्क, सॅनिटायझर वापर आणि सुरक्षीत अंतर सांभाळणे आपल्या व इतरांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे, लसीकरण झाले तरीही या बाबी प्रत्येकाने सांभाळण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्यंकट धवन यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आज अखेर उप जिल्हा रुग्णालयात ३५५२ आणि नागरी आरोग्य सुविधा केंद्रात १५२१ नागरिकांनी लसीकरण करुन घेतले आहे. शहर व परिसरातील नागरिकांनी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वेळेत या दोन्ही ठिकाणी आपले आधार कार्ड घेऊन यावे, त्यांना लसीकरण सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे डॉ.धवन यांनी सांगितले.
डॉ.अंशुमन धुमाळ, डॉ.किरण तारळकर, अधि परिचारिका श्रीमती एस.वाय.लांभाते, श्रीमती व्ही.वाय. रामपुरे यांनी मान्यवरांचे लसीकरण केले.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, डॉ.पुरुषोत्तम राजवैद्य (गुंगा), जेष्ठ पत्रकार श्री.अरविंदभाई मेहता, अँड.रोहित अहिवळे, श्री.चैतन्य रुद्रभटे, श्री.प्रसन्न रुद्रभटे, श्री.नामदेव नाळे उपस्थित होते.