कुंडलीक बाबूराव नाळे यांचे निधन

डोर्लेवाडी (फलटण टुडे वृत्तसेवा) :
  पिळदार शरीर, 85 किलो वजन ,उंची 6 फूट अशा बळकट शरीरयष्टीमुळे डोर्लेवाडी परिसरात सर्वत्र सुपरिचित असलेले कुंडलीक बाबूराव नाळे यांचे वयाच्या 85 व्या वर्षी डोर्लेवाडी (ता.बारामती) येथील राहत्या घरी आकस्मित निधन झाले. 

सुरुवातीपासूनच अंगमेहनतीची सवय असलेल्या कुंडलीक नाळे यांनी तरुण पणात 120 किलोचे साखरेचे पोते बारामती येथील भिगवण चौकातून उचलून 2.5 किलोमीटर चालत जाऊन  माळावरच्या देवीच्या मंदिराला वेढा घालून देवीच्या समोर ठेवण्याचा विक्रम केला होता. याबद्दल त्याकाळी त्यांना 101 रु बक्षीस मिळाले होते. शिंगणापूरच्या बळीच्या देवळातील गोटी उचलून महादेव मंदिराला वेढा घालून परत बळीच्या देवळात आणली होती. अंगात असलेल्या ताकदीचा त्यांनी चांगल्या कामासाठी नेहमीच उपयोग केला. अत्यंत खडतर परिस्थितीतून कुटूंबाला आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी त्यांनी हयातभर अतोनात कष्ट घेतले. अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डोर्लेवाडीच्या महात्मा फुले सोसायटीचे त्यांनी काही काळ चेअरमनपदही भुषवले होते. शांत, संयमी व मितभाषी स्वभावामुळे मोठा मित्र परिवार असलेल्या कुंडलीक नाळे यांच्या निधनाने डोर्लेवाडी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. 
त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले व दोन मुली,नातवंडे, नातसुना असा परिवार आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!