सातारा दि. 4 (जिमाका) : सातारा जिल्ह्यात 1 मार्च पासुन कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या टप्प्यात 60 वर्षावरील नागरिकांना तसेच 45 वर्षावरील कोमॉर्बीड (व्याधी असणारे) नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस घेतांना नागरिकांनी आधी आपले रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
लस घेतांना नागरिकांची रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑन लाईन रजिस्ट्रेशन करावे. जिल्ह्यात असणाऱ्या लोक सेवा केंद्रा (सीएससी केंद्र) मध्येही रजिस्ट्रेशन करता येईल. येथे नागरिकांना केवळ पाच रुपये शुल्क आकारुन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. तसेच मोबाईल ॲपवरुनही नोंदणी करता येईल. 45 वर्षावरील व्याधी असणाऱ्या नागरिकांनी कोविड वेबसाईटवरील आजारांची यादी तपासून घ्यावी . लवकरच खाजगी रुग्णालयांत देखील लस उपलब्ध होणार असुन त्याची किंमत रु. 250/- इतकी राहील, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले आहे.