मुंबई, दि. 16 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित लोकराज्यचा फेब्रुवारीचा अंक प्रकाशित झाला असून मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून अंकात मराठी भाषा, साहित्य आणि बोली भाषांचे सर्वेक्षण या अनुषंगाने विशेष लेखांचा समावेश करण्यात आला आहे.
कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त मराठी भाषा विभाग राबवित असलेल्या योजना आणि उपक्रमांबद्दल सविस्तर माहिती या अंकात दिली आहे. इतर भाषेतून आलेल्या शब्दांनी मराठी कशी समृद्ध केली याविषयीचा लेख, मराठी साहित्य, डिजिटल माध्यमातील मराठी, याबरोबरच वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणारा विशेष लेख यांचा अंतर्भाव अंकात करण्यात आला आहे.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विदर्भ दौरा, मंत्रिमंडळाने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांबरोबरच महत्त्वाच्या घडामोडींना अंकात स्थान देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काळजी आवश्यक आहे, लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाला आहे, त्यासंदर्भातील लेख आणि कोरोना काळात अतिशय ऐतिहासिक झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनावरील लेख या अंकाचे वैशिष्ट्य आहे. राजपथावर सादर केलेल्या चित्ररथाच्या छायाचित्रासह समृद्धी महामार्गाच्या कामाच्या रिपोर्ताजामुळे अंक संग्राह्य आहे.