सातारा दि. 15 (जिमाका): मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे सण, यात्रा, जत्रा व जयंती वैयक्तीक स्वरुपात साजरी करुन सातारकरानी कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मोठी मदत केली आहे. याच प्रमाणे येत्या 19 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या जयंती निमित्त गडांवर सामुहिक कार्यक्रम, मिरवणुकांचे आयोजन करु नये तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मुर्तीला पुष्पहार अर्पण करतांना 10 नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत शासनाने नियम जाहीर केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपल्या राज्याचे नव्हे संपूर्ण देशाच्या आस्थेचे स्थान आहे. प्रजेच्या आणि स्वराज्याच्या हितासाठी त्यांनी जे काम उभं केलं ते आपल्यासाठी नेहमीच प्रेरणा देणारं आहे. जिल्हा प्रशासन म्हणून माझी जनतेला विनंती आहे, त्यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर, सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून आपण पण एक वेगळे उदाहरण घालून द्यावे ,परंतु या कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 144 कलम लागू केले आहेत त्याचेही तंतोतंत पालन करावे, असेही आवान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.