वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख

         

   मुंबई, दि. १५ : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यशासन सकारात्मक असून यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

            सह्याद्री अतिथीगृहात वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध संघटनांनी श्री. शेख यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, विभागाचे सचिव पराग जैन आदी उपस्थित होते.

            बैठकीत सहकारी संस्थांना बिनव्याजी कर्ज देणे, प्रकल्प अहवालास मान्यता देणे, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ, सूतगिरण्यांना कापूस गाठीसाठी 10 टक्के अनुदान देणे, सहकारी सूतगिरण्यांना वीजदरातील सूट तसेच वीज बिलात सवलत, अतिरिक्त जमीनीची विक्री करण्याची परवानगी देणे, यंत्रमाग सहकारी संस्थांना एकरकमी तडजोड (वन टाईम सेटलमेंट योजना) राबविणे, साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी धोरण तयार करणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेसाठी प्रस्ताव पाठविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.    

            वस्त्रोद्योग मंत्री श्री.शेख म्हणाले की, सहकारी सूतगिरण्यांनी सौरऊर्जेसाठी खासगी सहभाग घेण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. वीज दर व वीजबिलातील सवलतीसंदर्भात ऊर्जामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. एकरकमी तडजोड योजनेसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कापूस खरेदीसाठी अनुदान तसेच अतिरिक्त जमिन विक्रीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागाने सादर करण्याचे निर्देशही श्री.शेख यांनी यावेळी दिले. 

            वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री.यड्रावकर म्हणाले, सहकारी सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्जासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत राज्यशासन व वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे प्रतिनिधींचा समावेश असावा.

            यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, रेशीम संचालक भाग्यश्री बातायत, वस्त्रोद्योग महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, ए.बी. चालुक्य, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन सतीश कोष्टी, ए.डी. दिवटे, एस.ए. कदम, श्रीकांत हजारे, शिवाजी रेडेकर, रफिक खानापुरे, नारायण दुरुगडे, खासगी यंत्रमाग संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, विजय निमते आदी उपस्थित होते.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!