फलटणला खेळाची उज्वल परंपरा आजही येथील विविध खेळातील गुणवंत खेळाडूंमुळे अखंडीत, फलटणचे नाव या क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर : श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब)

    फलटण दि. ७ : संस्थानकाळापासून या शहराला खेळाची उज्वल परंपरा आहे, येथे खो-खो, कब्बडी, हुतुतू वगैरे खेळातील नामवंत खेळाडूंनी शहराचे नाव उज्वल केले, आजही येथे खो-खो, हॉकी खेळातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील नामवंत खेळाडू आहेत, कुस्ती मध्येही महाराष्ट केसरी, हिंद केसरी पदे भूषविणारे अनेक पैलवान येथे असून तालीम आजही सर्वांच्या आवडीचा विषय असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी राज्यभरातून आलेल्या खेळाडूंचे स्वागत करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.
       फलटण संस्थानचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या वाढदिवसानिमित्त येथील मुधोजी क्लब मैदानावर आयोजित राज्यस्तरीय खुल्या बास्केट बॉल स्पर्धांना सदिच्छा भेट व संयोजक आणि राज्य भरातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) काही वेळ मुधोजी क्लब येथे आले होते. त्यावेळी श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, मा.उपनगराध्यक्ष नितीनभैय्या भौसले, महाराष्ट्र केसरी पै.बापूराव लोखंडे, सातारच्या मा.नगराध्यक्षा व विद्यमान नगरसेविका सौ.सुजाता राजेमहाडिक, फलटणच्या मा.नगराध्यक्षा श्रीमती विद्याताई गायकवाड, नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे, नगरसेविका सौ.दिपालीताई निंबाळकर, नगरसेविका सौ.ज्योत्स्नाताई शिरतोडे, मा.नगरसेवक चंद्रकांत शिंदे, मा.नगरसेवक भिमदेव बुरुंगले, सौ.प्रितमताई लोंढे-पाटील, अमरसिंह खानविलकर, मोहनराव नाईक निंबाळकर, सौ.सोनालीताई सुर्यवंशी (बेडके), क्रेडाईचे महेंद्र जाधव, राहुलभैया निंबाळकर, संजय फडतरे, बाळासाहेब बाबर, मोहनराव खलाटे, महादेवराव माने, मुकुंद रणवरे, भाऊ कापसे यांच्यासह फलटण व परिसरातील क्रीडा प्रेमी नागरिक, राज्यभरातील खेळाडू आणि फलटणकर उपस्थित होते.
        फलटणच्या ग्रामीण भागातील हॉकी खेळाडू कु.अक्षदा ढेकळे, कु.वैष्णवी फाळके, कु.ऋतुजा पिसाळ यांनी भारतीय ज्युनिअर हॉकी संघात निवड झाल्यानंतर मोठ्या मेहनत व कौशल्याने चिली, अमेरिका येथील स्पर्धेत भारतीय संघाला उज्वल यश प्राप्त करुन दिले, या ज्युनिअर महिला हॉकी संघाने तेथील सिनिअर संघाशी झालेल्या स्पर्धेतही विजयश्री प्राप्त केल्याचे निदर्शनास आणून देत या खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी शुभेच्छा दिल्या.
       नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी येथे राज्यस्तरीय बास्केट बॉल स्पर्धांचे आयोजन केल्याने फलटण करांना राज्यस्तरीय नामवंत खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी लाभणार आहे, त्याचबरोबर येथील खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल असा विश्वास व्यक्त करीत राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजनाबद्दल त्यांनी संयोजकांचे कौतुक केले.
       बास्केट बॉल हा अत्यंत वेगवान खेळ असून आपण स्वतः कधी खेळलो नसलो तरी माझी सुकन्या कु.सईराजे बालपणापासून बास्केट बॉल खेळत असल्याने आपल्याला या खेळांविषयी आकर्षण असल्याचे नमूद करीत माझ्या कन्येने बास्केट बॉल मध्ये प्राविण्य मिळविले आहे, आज जर्मनी मध्ये असल्याने तेथे काय परिस्थिती आहे माहित नाही, परंतू त्यांना बास्केट बॉल प्रेम तेथेही गप्प बसू देणार नाही, काही तरी मार्ग काढून, वेळ उपलब्ध होताच त्या तेथेही बास्केट बॉल खेळत असणार याची ग्वाही महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी दिली आहे.
       आपले पुण्यातील निवासस्थान पीवायसी मैदानाशेजारी असल्याने आपला विविध खेळ व खेळाडूंशी निकट संपर्क आहे, आपण स्वतः क्रिकेट प्रेमी असून काही काळ रणजी खेळाडू म्हणून योगदान दिले, मैदानावर गुडघा दुखावल्याने आपण पुढे खेळू शकलो नाही, तरी क्रिकेट प्रेम कायम आहे, कु.सईराजे यांनाही पीवायसी ग्राउंड मुळे बास्केट बॉल मध्ये उत्तम संधी लाभल्याचे श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब) यांनी निदर्शनास आणून दिले.
       प्रारंभी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात या स्पर्धेत सहभागी विविध संघांविषयी माहिती दिली.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!