जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 140 कोटींच्या वाढीव मागणीसह 485.90 कोटींचा जिल्हा नियोजनचा प्रारुप आराखडा मंजूर

सातारा दि.29 (जिमाका):  जिल्हा वार्षिक योजनेची सन 2021-22 च्या प्रारुप आराखडा मंजुरीची  बैठक सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न  झाली. बैठकीत 2021-2022 जिल्हा वार्षिक योजनेसाठी  140 कोटींच्या वाढीव मागणीसह 485.90 कोटींच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने  मान्यता दिली.

                जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आज झालेल्या आयोजित बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार दिपक चव्हाण, आमदार महेश शिंदे,  जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

                सन 2021-22 साठी राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी  140 कोटींच्या वाढीव मागणीसह 404.49 कोटींची, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 79.83 कोटी तर आदिवासी क्षेत्र बाह्य उपयोजनेसाठी 1.58 कोटी   इतक्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली.

                आयत्या वेळच्या विषयामध्ये उंब्रज ता. कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे, मौजे मारुल हवेली ता. पाटण व कोपर्डे हवेली ता. कराड येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे व विस्तारीकरण करण्याचा  प्रस्ताव , बा.सी. मर्ढे यांच्या मेर्ढे ता. सातारा या गावास क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्याचा  प्रस्ताव, सिद्धेश्वर देवस्थान मारुल हवेली, वडजाई देवी देवस्थान वडजल ता. माण, श्री जोम मल्लिकार्जुन देवालय वाघावळे ता. महाबळेश्वर या स्थळांना क वर्ग यात्रा स्थळांचा दर्जा देण्याबरोबर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण कामाबाबत तसेच सन 2019-20 च्या मंजुर आराखड्यातील तांत्रिक मान्यता प्राप्त असलेली प्रास्तावित कामे व सन 2020-21 च्या आराखड्या बाहेरील कामे आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत सभागृहात सदस्यांसोबत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.

                तसेच विविध विभागांकडील 2020-21  जिल्हा वार्षिक योजनेमधील नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत  प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सभागृहात चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!