कोरोना संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. प्रगत म्हणणाऱ्या देशाच्या आरोग्य व्यवस्थांनी पण हात टेकले. या कोरोना संसर्गात सर्वात मोठी शक्ती तुमच्या शरिरातील प्रतिकार शक्ती अधिक असणं आहे. हे कोरोना विषाणू नवीन असल्यामुळे आपल्या शरिरातील प्रतिकार करणाऱ्या पेशींना याची ओळख नाही…. त्यामुळे यावर सध्या जे काही प्राथमिक उपचार आहेत, त्यात प्लाझमा थेरीपी हा एक उपचार आहे. नेमकी काय आहे ही प्लाझमा थेरीपी यावर प्रकाश टाकणारा हा लेख आवश्य वाचा… आणि तुम्ही जर कोरोनामुक्त असाल तर व्हा प्लाझमा दाते…!!
कोविड पॉझिटीव्ह उपचारानंतर तुम्ही पूर्ण बरा झालात. या दरम्यान तुमच्या शरिरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करणारे प्रतिजैविके (antibodies) तयार होतात. तसे तयार झालेले प्रतिजैविके फेरोसिस प्रक्रियेद्वारे आपल्या रक्तातील प्लाझमा वेगळे करुन अन्य गंभीर कोविड रुग्णाला दिल्यास त्याच्या शरिरात हे प्रतिजैविके जाऊन त्याला कोरोना विरुद्ध लढायला मदत करतात. त्यासाठी कोवीड मधून बरे झालेल्या रुग्णांनी २८ दिवस ते चार महिने या कालावधीत प्लाझमा दान करणे आवश्यक असतं.
प्लाझमा दान करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर दोन दिवस आधी जिथे व्यवस्था आहे त्या रक्तपेढीत बोलावून रक्ताचे नमुने घेण्यात येतात. या नमुन्याच्या चाचण्या झाल्या नंतर प्लाझमा तुम्ही दान करु शकतो की नाही हे डॉक्टर सांगतात. तुम्ही देण्यायोग्य असाल तर डॉक्टर दान करायला सांगतात.
प्लाझमा देणे ही रक्तदानासारखीच प्रक्रीया आहे. मात्र त्यासाठी फेरोसिस मशिन वापरावे लागते. या मशिनमध्ये आपल्या शरिरातील रक्त काढले जाते. मशिनमध्ये रक्ताचे पृथ्थकरण होऊन त्यातला प्लाझमा वेगळा केला जातो. तर रक्तातील उर्वरित घटक जसे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स इ. पुन्हा आपल्या शरिरात सोडले जातात. हे एकाच वेळी होत असते. अवघ्या तास दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण करुन आपण घरी परत येऊ शकतो. प्लाझमा दान केल्यावर आपण स्वतः आराम करणे आवश्यक असते. किमान दिवसभर श्रमाचे काम करु नये असा सल्ला डॉक्टर देतात. दान केलेल्या प्लाझमाची पातळी पूर्ववत भरुन येण्यासाठी १२ तासांचा कालावधी पुरेसा असतो.
संकलित केलेला प्लाझमा अत्यवस्थ वा गंभीर कोरोना रुग्णाला दिला जातो. हे करतांना दात्याचे व ज्या रुग्णाला प्लाझमा दिला जातोय अशा दोघांचे नाव गोपनिय ठेवले जाते. मात्र प्लाझमा दाता आणि रुग्ण यांचा रक्तगट एकच असणे आवश्यक आहे. हा प्लाझमा संबंधित रुग्णाच्या शरिरात सोडल्यानंतर प्लाझमा मधील तयार प्रतिजैविकांची फौज कोरोना विरुद्ध लढायला मदत करते.
प्लाझमा दान करणे हे आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचे व आवश्यक आहे. त्यामुळे जे कोरोना मुक्त झाले आहेत, त्यांनी आवश्य प्लाझमा दान करावे. कोणाचा तरी जीव वाचवण्यात आपला तेवढाच हातभार लागतो. अनेक जन आता प्लाझमा दानासाठी पुढे येत आहेत. तुम्हीही कोरोनामुक्त असाल तर पुढे या आणि प्लाझमा दान करा…असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आ.मकरंद पाटील यांनी केले आहे आणि त्यांनीही दान करणार असल्याचे सांगितले आहे..!!
कोरोना मुक्ती ते प्लाझमा दाता हे तुमच्यासाठी जीवन अनुभव असेल हे नक्की… !!
– युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, सातारा