बारामती:बारामती औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्रायबर डायनामिक्स डेअरीज् प्रा. लि. मधील कायम कामगार व कर्मचारी यांना प्रत्येकी वीस लाख रुपयाचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय कंपनीने जाहीर केला आहे. या प्रसंगी प्लांट मॅनेजर जितेंद्र जाधव, मानव संसाधन विभाग प्रमुख मंजुश्री चव्हाण, मा. सं. विभाग अधिकारी रावसाहेब मोकाशी, मुकेश चव्हाण, युनियन अध्यक्ष नाना थोरात, उपाध्यक्ष रीना केकाण, सरचिटणीस संदीप बनकर व युनियन पदाधिकारी अविनाश चांदगुडे, मन्सूर सय्यद, सुरेश कुचेकर, मनोज कारंडे, संजय गायकवाड उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना प्लांट मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी सांगितले की, श्रायबर डायनामिक्स आपल्या कामगार व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असून त्यांच्या हिताला नेहमीच प्राधान्य देत असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता वाटावी, दुर्दैवाने कोणत्याही कारणास्तव काही अघटीत घडल्यास अवलंबितांना आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी सर्व कायम सदर विमा संरक्षण देण्यात आले आहे. याप्रसंगी मा. सं. विभाग प्रमुख सौ. चव्हाण यांनी, सद्यस्थितीत सर्वांनी योग्य ती काळजी घेऊन कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद करून सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. त्याचप्रमाणे कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कायम व कंत्राटी कामगार/कर्मचाऱ्यांना स्टीमर (वाफ घेण्याचे मशीन) वाटप केल्याचेही सौ. चव्हाण यांनी नमूद केले. कामगार/कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासाठी विमासंरक्षण मोठा आधार ठरणार असल्याचे प्रतिपादन युनियन अध्यक्ष नाना थोरात यांनी करून कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.