फलटण : कोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला विळखा घातला असताना त्याला घाबरुन न जाता शासन, प्रशासन आणि लोकशक्तीच्या एकजुटीतून गेले 4/5 महिने आपण सर्वांनी दिलेला लढा निश्चित प्रेरणादायी असून रुग्ण संख्या वाढत असली तरी घाबरुन न जाता योग्य निदान व वैद्यकिय उपचाराद्वारे त्यावर मात करण्याचे आवाहन करतानाच त्यासाठी शासन आणि व्यक्तीगतरित्या मी स्वत: तुमच्या बरोबर आहे योग्य काळजी घ्या, सुरक्षीत रहा असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. 15 सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यभर माझे कुटुंब, माझी जबाबदारी हे अभियान लोकांच्या साथीने राबविण्याचे ठरविले असून त्याचा फलटण तालुक्यातील शुभारंभ तरडगाव ता. फलटण येथील जिल्हा परिषद प्रा. आरोग्य केंद्रात श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक करण्यात आला. त्यावेळी आ. दिपक चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समिती उपसभापती सौ. रेखाताई खरात,सरपंच सौ. जयश्री चव्हाण, उपसरपंच प्रदिप गायकवाड व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य, माजी सभापती वसंतकाका गायकवाड, गटविकास अधिकारी डॉ.सौ.अमिता गावडे पवार, प्रा.आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. कदम यांच्यासह तरडगाव व परिसरातील आजी, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सद्स्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.