झिरपवाडी ता.फलटण येथील जुन्या वापरात नसलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्वावर विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय .

फलटण : दि.८ : झिरपवाडी ता.फलटण येथील जुन्या वापरात नसलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये जनता, सार्वजनिक संस्था भागीदारी तत्वावर (Public Private Participation) संसर्गजन्य आजारासाठी रुग्णालय उभारण्याबाबत विधान भवनात महाराष्ट्र विधान परिषद सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय करण्यात आला आहे.

या बैठकीस आरोग्य मंत्री मा.ना.राजेश टोपे साहेब, मा.आ.दिपकराव चव्हाण साहेब, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्त मा.श्री.एन.रामास्वामी, आरोग्यसेवा संंचलनालय संचालिका मा.डॉ.तायडे, प्रांताधिकारी फलटण मा.डॉ.शिवाजीराव जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक सातारा मा.डॉ.सुभाष चव्हाण उपस्थित होते.
राज्य शासनाच्या आरोग्य खात्याकडील अंदाजपत्रकावर ताण न येता सदर रुग्णालय सुरु करता येईल, त्यासाठी आपण ते पीपीपी तत्वावर सुरु करावे, अशी सूचना करीत आरोग्य सेवा सुविधांसाठी चांगले काही करण्याची आपली मानसीकता असून त्यादृष्टीने फलटण येथे जागा आणि त्यावर इमारत उभी असल्याने पीपीपी तत्वावर सदर रुग्णालय सुरु करण्यास परवानगी देण्याची औपचारिक घोषणाच आरोग्यमंत्री मा.ना.राजेश टोपे साहेब यांनी या बैठकीत केली असल्याने गेल्या अनेक वर्षापासून बंद स्थितीत असलेले हे रुग्णालय सुरु होणार असल्याच्या निर्णयामुळे फलटण व परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे येथील नायडू संसर्गजन्य रुग्णालयाच्या धर्तीवर फलटण येथील सदर रुग्णालय संसर्गजन्य रुग्णालय म्हणून उभारण्याची आवश्यकता आहे, त्यासाठी एखाद्या चांगल्या खाजगी रुग्णालयाच्या सहभागातून सदर हॉस्पिटलची उभारणी करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची ग्वाही सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी बैठकीत दिल्यानंतर आयुक्त मा.श्री.रामास्वामी यांनी सदरची जागा या योजनेसाठी खुली असल्याचे स्पष्ट केल्यानंतर आरोग्य सेवा संचालिका मा.डॉ.तायडे यांनी पीपीपी तत्वावर रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव दाखल होताच पुढील कार्यवाहीचे आश्‍वासन यावेळी दिले.
बैठकीस उपस्थित असलेले फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी मा.डॉ.शिवाजीराव जगताप यांना या निर्णयाची कार्यवाही करण्याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी बैठकीत दिल्यानंतर प्रांताधिकार्‍यांनी या प्रश्‍नाबाबत भूसंपादन व इतर माहिती घेवून प्रस्ताव सादर करण्याबाबत सभापतींना अवगत करण्याचे स्पष्ट केले.
बैठकीस येण्यापूर्वी आपली मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा झाली असून त्यानुसार विभागनिहाय संसर्गजन्य रुग्णालये उभारण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. तथापी पुणे विभागात सदरचे रुग्णालय कोठे होणार याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट करताच सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी शासनाने याबाबत धोरण निश्‍चित करुन नायडू रुग्णालयाच्या धर्तीवर फलटणचे रुग्णालय उभारण्याचा निर्णय करावा असे निर्देश बैठकीत दिले आहेत.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील प्रा.आरोग्य केंद्राच्या माध्यमातुन सध्या शहर व तालुक्यात दिली जाणारी आरोग्यसेवा पुरेशी नसल्याने झिरपवाडी येथील सदरचे रुग्णालय पुन्हा सुरु करण्याचा तसेच उपजिल्हा रुग्णालय अधिक सक्षम करुन तेथे अधिक वैद्यकिय सेवा सुविधा व अधिक वैद्यकिय अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याची फलटणकरांची अनेक दिवसांची मागणी आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सभापती मा.ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी विधान भवनात सर्व संबंधीतांची बैठक बोलावुन वरीलप्रमाणे निर्णय केल्याबद्दल फलटणकरांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!