लम्पी स्कीन डीसीज बद्दल माहिती व रोग प्रादुर्भाव होऊ नये यासाठीच्या उपायोजना

सातारा दि.7 (जिमाका):  लम्पी स्कीन हा विषाणूजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने गोवंशिय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणुजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रीपॉक्स या प्रवर्गातील विषाणु मुळे हा रोग होतो. सर्व साधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणुला लवकर बळी पडतात. रोगाचा प्रसार कीटके जसे डास चावणाऱ्या माश्या, गोचीड इत्यादीमार्फत होतो. बाधित जनावरांपासून गोचीड व गोमाश्याद्वारे सदृढ जनावरास रोगाचा प्रसार होतो. या आजाराच्या विषाणुचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील प्रत्यक्ष स्पर्शांनी होतो. या रोगाची बाधा गायवर्ग व म्हैसवर्गातील सर्व वयोगटातील जनावरांना होतो. लहान वासरांमध्ये रोगाची तिव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण 10 ते 20 टक्के जनावरांमध्ये होतो. यातील मरतुकीचे प्रमाण 1 ते 5 टक्के इतके आहे.

लम्पी स्कीन आजारामध्ये जनावरांना ताप येणे, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव होणे, भूक मंदावणे इत्यादी सुरुवातीचे लक्षणे दिसतात. नंतर डोके, मान, मायांग, कास इत्यादी ठिकाणी दोन ते पाच सेंटीमीटर (10-15 मिमी) व्यासाच्या गाठी येतात. त्यातून पु येऊ शकतो. गाभण जनावरांमध्ये जीवाणुंचा संसर्ग होऊन दुय्यम आजार होऊ नये म्हणून प्रतीजैविके पाच ते सात दिवस द्यावी लागतात. सात दिवसाच्या नियमित योग्य उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा होतो.

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रथम आजारी जनावरांना वेगळे करावे. आजारी जनावरांचे खाद्य, चारा, पाणी व्यवस्था वेगळी करावी. या आजाराचा किटकांपासून प्रसार होत असल्याने आपल्या गोठ्यातील कीटकांचा, डास चावणाऱ्या माश्या, गोचीड यांचा बदोबस्त करावा तसेच गोठ्या शेजारी पाणी, शेण, मलमूत्र जमा होऊन चिखल होणार नाही याची काळीजी घ्यावी, असे पुशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी कळविले आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!