- *_2 सप्टेंबरपासून व्यक्ती व वस्तू यांच्या आंतरजिल्हा हालचाली विनापास सुरु.._*
- *_2 सप्टेंबरपासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीस परवानगी.._*
- *_2 सप्टेंबरपासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना आदर्श कार्यप्रणालीनुसार चालू ठेवणेस परवानगी.._*
- *_आदेशात बदल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनाच.._*
सातारा दि. 31 (जिमाका): आज दि. 31 ऑगस्ट रोजीच्या शासनाच्या आदेशानुसार राज्यातील कोरोना (कोविड-19) च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत आदेश परित केलेला असून सदर लॉकडाऊन कालावधी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार सातारा जिल्हयात 1 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत.
*जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करणेत येत आहेत.*
• सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्ट्युटयुट या बंद राहतील. तथापि, ऑनलाईन/ अंतराचे शिक्षणास परवानगी राहील.
• चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उदयाने, थिएटर (मॉल्स व मार्केट कॉम्प्लेक्समधील ), बार, सभागृह, असेंबली हॉल यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील.
• रेल्वे व विमान प्रवासी वाहतूक काही ठराविक आदेशाने मान्यता दिली असल्यास किंवा आदर्श कार्य प्रणाली नुसार चालू राहील.
• सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील.
• सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करणेत येत आहे.
• सर्व धार्मीक स्थळे व प्रार्थना स्थळे सर्वसामान्यासांठी बंद राहतील. तथापि, सर्व धार्मिक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे ही सामान्य व्यक्तींकरिता बंद राहतील. तथापि, तेथील नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम संबंधित धर्मगुरु, पुजारी यांना करता येतील.
• वय वर्ष 65 वरील व्यक्ती, व्याधीग्रस्त नागरिक, गर्भवती महिला, 10 वर्षा खालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा व वैदयकीय सेवा वगळता इतर कारणास्तव बाहेर पडण्यास प्रतिबंध राहील.
*जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सातारा जिल्हा कार्यक्षेत्रातील खालील बाबींना परवानगी राहील.*
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून सर्व हॉटेल व लॉजिंग यांना चालू ठेवणेस परवानगी देत आहे. तथापि, शासनाने निर्धारित केलेली आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून व्यक्ती व वस्तू यांना आंतरजिल्हा हालचालींवर कोणतेही बंधन नाही. अशा हालचालींसाठी वाहने आणि त्यातून प्रवास करणाऱ्या व्यक्तींसाठी स्वतंत्र परवानगी /मान्यता/ई-परवान्याची आवश्यकता नाही.
• दिनांक 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बस, मिनी बस व इतर यंत्रणेव्दारे प्रवासी वाहतूकीसाठी परवानगी राहील. तथापि त्याकरीता परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी निर्देशित केलेल्या आदर्श कार्य प्रणाली (SOP) चे पालन करणे बंधनकारक राहील.
• बाहय शारिरीक क्रियाकलाप (Outdoor Physical Activities) करणेस कोणतेही बंधन असणार नाही.
• सर्व सार्वजनिक व खाजगी वाहतूकीतील लोकांच्या हालचाली करण्यास पुढीलप्रमाणे परवानगी राहील. टॅक्सी / कॅब/ ॲग्रीगेटर – फक्त अत्यावश्यक 1+ 3, रिक्षा – फक्त अत्यावश्यक 1+ 2, चार चाकी- फक्त अत्यावश्यक 1+3, दोन चाकी – 1 + 1 मास्क व हेल्मेटसह. प्रवास करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल.
• सर्व मार्केट/ दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 7 या वेळेमध्ये चालु रहातील. तथापि, मेडीकल/औषधाची दुकाने पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी राहील. जर पाच पेक्षा जास्त व्यक्ती दुकानात असल्यास अथवा सामाजिक अंतराचे पालन न केलेस तात्काळ बंद करावीत.
• सातारा जिल्हयातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. तथापि, प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/हॉल/सभागृह, घर व घराच्या परिसरात 20 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्नाशी संबंधित मेळावे/ समारंभाचे आयोजन करणेकामी संबंधित तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक राहील. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश दि.26/06/2020 मधील अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
• अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत (संपुर्ण कार्यक्रमासाठी) व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन कार्यक्रम करणेस परवानगी राहील.
• वृत्तपत्र छपाई आणि वाटप करणेस परवानगी देणेत येत आहे. (घरपोच वितरणासह)
• केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर हे शासनाने दिलेल्या अटी व शर्ती तसेच जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि.27 जून 2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी देणेत येत आहे.
• सातारा जिल्हयातील सर्व सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र व आधारकेंद्र जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचेकडील आदेश दि. 11 जून 2020 मधील अटी व शर्तीन्वये चालू ठेवणेस परवानगी राहील.
• सातारा जिल्हयातील इंधन पंप, औदयोगिक आस्थापना व सर्व वैदयकीय आस्थापना पुर्णवेळ चालू ठेवणेस परवानगी आहे.
• अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी अन्य कोणत्याही विशिष्ट/सामान्य आदेशाव्दारे परवानगी देणेत आलेली कृती करणेस परवानगी राहील.
*घालून दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्यास दंडात्मक/फौजदारी कारवाई*
• सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणा-या व्यक्तींवर 500/- रु दंड आकारावा.
• सातारा जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास 1000/- रु दंड आकारावा
• दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान 6 फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत येत आहे. सदर आदेशाचे ग्रामीण भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु.500/- दंड आकारावा. ग्रामीण भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 1000/- दंड आकारावा. व ग्रामीण भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. सदर आदेशाचे शहरी भागात प्रथम उल्लंघन झालेस र.रु. 1000/- दंड आकारावा. शहरी भागात दुसऱ्यांदा उल्लंघन झालेस र.रू. 2000/- दंड आकारणेत आकारावा. व शहरी भागात तिसऱ्यांदा उल्लंघन झालेस दुकानाचा परवाना तीन दिवसांसाठी निलंबित करून सदर दुकान तीन दिवसांसाठी बंद ठेवणेत यावे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी.
• जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या खाजगी ठिकाणी तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
*कामाच्या ठिकाणी खालील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.*
• शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे.
• कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायीक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून दयाव्यात. थर्मल स्कॅनिंग, हॅडवॉश, सॅनिटायझर, याची येतानाचे व जातानाचे ठिकाणावर व्यवस्था करावी.
• कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे.
• औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
*आरोग्य सेतु ॲप चा वापर*- जिल्हयातील सर्व नागरिकांना शासकीय कार्यालयात तसेच सर्व सार्वजनिक ठिकाणी आरोग्य सेतू या ॲपचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच हे ॲप व त्यावरील माहिती प्रत्येकाने वेळोवेळी अद्ययावत करणे बंधनकारक राहील.
मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील 31 ऑगस्ट रोजीच्या आदेशा मधील Annexure I मध्ये नमूद केलेल्या सुचनांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील.
*कटेंनमेंट झोन*- ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडतो, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहिर करण्याचे अधिकार इन्सीडंट कमांडर म्हणून संबंधित उपविभागीय अधिकारी यांना देणेत आलेले आहेत. संबंधित कंटेनमेंट झोन बाबत उपविभागीय अधिकारी हे वेगळा आदेश काढून त्या झोन मध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील. हा आदेश कंटेनमेंट झोन वगळता सातारा जिल्हयातील इतर क्षेत्रासाठी लागू राहिल तसेच कंटेनमेंट झोन बाबत त्या त्या क्षेत्रातील इन्सीडंट कमांडर यांचे अस्तित्वात असलेले आदेश हे संबंधित क्षेत्रात लागू राहतील. तसेच कंटेनमेंट झोन कोरोनामुक्त (अप्रभावी) झाल्यानंतर सदर क्षेत्राला इकडील आदेश लागू राहतील. तसेच भविष्यामध्ये जर सातारा जिल्हयातील कोणत्याही ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळतील त्या ठिकाणी संबंधित इन्सीडंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी हे सदर ठिकाणी नव्याने कंटेनमेंट झोन जाहिर करुन वेगळा आदेश काढून त्या झोनमध्ये कोणत्या बाबी चालु राहतील व कोणत्या बाबी प्रतिबंधित राहतील याबाबत सर्वाना सुचित करतील.
*कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला, सदर आदेशात कोणत्याही प्रकारचा बदल करून किंवा नवीन आदेश पारीत करून या आदेशाच्या विसंगत कोणताही आदेश, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सातारा यांचे पुर्व परवानगीशिवाय पारीत करता येणार नाही.*
जिल्हाधिकारी यांच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील 31 ऑगस्ट रोजीच्या आदेशामधील Annexure III मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी करावी, असेही या आदेशात नमूद आहे.