आसू ( राहुल पवार ): फलटण तालुक्यात संततधार सुरु आहे अद्याप जोराचा पाऊस झालेला नाही, मात्र धरणावरती पडणारा मुसळधार पाऊस व तालुक्यात पडणारी संततधार यामुळे निरा नदी भरून वाहत आहे. यामूळे नदीकाठच्या गावांचा पाण्याचा प्रश्न व सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत झाली आहे.
निरा खोऱ्यातील धरण क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने नीरा माई लागली वाहू
निरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे फलटण तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी नदी भरून वाहू लागली आहे. फलटणबरोबरच बारामती (जि. पुणे) माळशिरस (जि. सोलापूर), या तालुक्यांतील नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या आठ दिवसांपासून नीरा खोऱ्यातील धरणक्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे. वीर धरण 95 टक्के भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आले आहे. नदीकाठच्या गावातील शेतकरी नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
फलटण तालुक्यामध्ये जोराचा पाऊस नसला तरी नदीला पाणी आल्यामुळे काठवरच्या गोखळी, ढवळेवाडी, साठे, सरडे परिसरातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात कमी होणार आहे.