सातारा दि. 24 (जि. मा. का) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे येत्या 7 ते 8 दिवसात अत्याधुनिक कोरोना टेस्टींग लॅब सुरु होईल, यामुळे कोरोना टेस्टींगचे अहवाल लवकरात लवकर मिळून बाधितांवर तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आज कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावासंदर्भात आढावा बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार दिपक चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते.
लग्नकार्यामुळे राज्यात प्रादुर्भाव झाल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, काही लग्न कार्यातून कोरोना बाधित वाढल्याचे लक्षात आले असून लग्न कार्यासाठी रितसर परवानगी घेणे आवश्यक असून 20 लोकांनाच लग्नात उपस्थित राहण्यासाठी परवानगी द्यावी. कुणी विना परवानगी लग्न कार्य करत असेल तर कायदेशीर कारवाई करावी.
कोरोना साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करुन देण्याबाबत शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने 23 मे 2020 अन्वये शासन निर्णय जारी केलेला आहे. या योजनेची अंमलबजावणी शासन निर्णया प्रमाणे होते किंवा कसे याची तपासणी तसेच रुग्णाचे आकारण्यात आलेले बाबनिहाय देयक योग्य आहे का आणि देयकाचा कालावधी बरोबर आहे याची तपासणी करण्यासाठी, अधिकारी, ऑडीटर, कर्मचारी यांची नियुक्तीचे आदेश जारी करण्यात आल्याचेही त्यांनी या बैठकीत सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. शासनाकडून योग्य ती मदत मिळत आहे. मी जिल्ह्यातील प्रत्येक चेक पोस्टची पहाणी केली असून पोलीस प्रशासन योग्य रित्या काम करीत असून लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार प्रशासनही काम करीत असल्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) श्री. देसाई या बैठकीत सांगितले.
प्रास्ताविकात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरण करताना दिली. यावेळी ते म्हणाले, कोरोना बाधित 2 हजार 760 झाली असून यामध्ये जावली तालुक्याचा मृत्युदर 3.5, कराड 2.04, खंडाळा 3.84, खटाव 7.58, कोरेगाव 3.2, माण 5.68, महाबळेश्वर 16.66, पाटण 5.28, फलटण 4.39, सातारा 3.09 व वाई 3.31 तर जिल्ह्याचा मृत्युदर 3.55 असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीत उपस्थित खासदार व आमदारांनीही यावेळी विविध सूचना केल्या.