फलटण – दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारने वाऱ्यावर सोडले असून दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.त्या मुळे प्रति लिटर पाच रुपये दर ताबडतोब वाढवा या मागणीसाठी माजी खा.राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली आज दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध बंद आंदोलन केले. ते दूध रस्त्यावर न ओतता विविध मंदिरात दुग्धाभिषेक घालून अनोख्या पध्दतीने आज फलटण तालुक्यातील आंदोलन करण्यात आले.
गेली अनेक दिवस दुध उत्पादक शेतकरी दुधाला दर मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत सापडला आहे. या कडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच दुधाला चांगला भाव मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली दूध बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला फलटण तालुक्यातील सर्व शेतकरी सहभागी झाले होते.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण चे प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांना राज्य शासनाने दुध दर वाढवावे या मागणीचे निवेदन दिले. दरम्यान आत्तापर्यंत दूध रस्त्यावर ओतून दुधाचे आंदोलन करण्यात येत होते. मात्र या वेळी हे दूध रस्त्यावर न ओतता येथील शुक्रवार पेठेतील माणकेश्वर मंदिर,साखरवाडी येथील महादेव मंदिर, व स्वयंभू असलेले सोमंथळी येथील मारुती मंदिरात दुग्धाभिषेक घालून एक अनोखे आंदोलन करून दूध दर वाढ मिळण्यासाठी राज्य सरकार ला सद्बुद्धी द्यावी या साठी महादेवा कडे साकडे घालण्यात आले. या वेळी डॉ.रविंद्र घाडगे,तालुकाध्यक्ष नितीन यादव,शहराध्यक्ष सचिन खानविलकर,प्रमोद गाडे,सुभाष जाधव,बाळासाहेब शिपकुले,शिवाजीराव सोडमिसे,प्रल्हाद अहिवळे,दादा जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते,शेतकरी, दूध उत्पादक उपस्थित होते.
फोटो – मंदिरात दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते