फलटण : सध्या संपूर्ण जगामध्ये करोना या आजाराने थैमान घातलेले असताना फलटण मध्ये करोनाचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काही काळामध्ये जास्त प्रमाणात दिसून आला नाही. अगदी तुरळक प्रमाणात रुग्ण फलटण तालुक्यामध्ये आढळून आले. सुरुवातीचे काही महिन्यांमध्ये फलटण शहरामध्ये तर एकही रुग्ण आढळून आला नाही. ज्यांचा करोना रुग्णांचा पुणे व मुंबई येथे जास्त प्रमाणामध्ये संपर्क आलेला आहे, त्यांच्याच कॉन्टॅक्ट मधील सुरुवातीच्या काळामध्ये फलटणमध्ये करोनाची लागण झाली असल्याचे समोर येत होते. परंतु आता फलटण शहरासह फलटण तालुक्यामध्ये करोनाने आपले हातपाय पसरले असून आता नागरिकांनी स्वतःची स्वतः काळजी घेणे, हे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणजे करोनाच्या बाबतीत आपण स्वतः आत्मनिर्भर होणे एवढेच आपल्या हातात असून आगामी काळामध्ये करोनाची लस उपलब्ध होईपर्यंत तरी शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे एवढेच आता फलटणकर नागरिकांच्या हातात आहे. सध्या फलटण तालुक्यामधील करोनाची वाटचाल हि व्दिशतकाकडे चालली आहे. फलटणकर हे सूज्ञ नागरिक असून काही हुल्लडबाजी करणाऱ्यां मुळे करोना हा आजार फलटणकर नागरिकांच्या घरातपर्यंत पोहचू शकतो.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये करोनाचे चाळीस रुग्ण सापडल्याने फलटण तालुक्यामध्ये हाहाकार
आपल्याला आजच्या परिस्थितीमध्ये करोना या जीवघेण्या आजारावर जीवन जगणे शिकणे अत्यंत गरजेचे आहे. शासन संचारबंदी कायम स्वरूपी ठेवू शकत नाही. गोरगरीब जनतेचे हाल संचार बंदी होत होते. ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांना कोणताही अन्य पर्याय संचारबंदी मध्ये उपब्धत झाला नव्हता. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन अन्नदान व किराणा मालाची घरपोच केले, त्यामधूनच गोरगरीब नागरिक हे जीवन जगू शकले आहेत. जर सामाजिक संस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी करोना आजाराच्या काळात मदत केली नसती तर त्याचा भयंकर मोठा फटका हा हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांना बसला असता. आता ही संचारबंदी शिथिल केल्यानंतर सर्व व्यवसाय पूर्ववत सुरू झाले आहेत असे नाही. बहुतांशी व्यवसाय नियम व अटींच्या कचाट्यात सापडल्यामुळे त्यांना शासनाच्या नियमांचे पालन करूनच आपले व्यवसाय सुरू करावे लागत आहे. त्यामुळे याचा फटका नोकरदार वर्गाला ही बसला आहे. संचारबंदी घोषित केल्यानंतर सर्व व्यवसायिकांनी आपल्याकडील कामगार कमी केले अथवा त्यांच्या पगारात कपात केलेली आहे. काही ठराविकच असतील त्यांनी कामगार कमी केलेले नाहीत अथवा पगारमध्ये ही कपात केलेली नाही. परंतु आगामी काळामध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपले जीवन जगावे लागणार आहे. त्याशिवाय कोणासमोरही कसलाही पर्याय राहिलेला नाही, असे मत सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
फलटण शहरासह तालुक्यामध्ये करोना या आजाराचे पंधरा नवीन रुग्ण सापडल्याने फलटण तालुक्यामध्ये हाहाकार उडाला व फलटण तालुक्याची एकूण करोना पॉझिटिव्ह असलेली रुग्ण संख्या सुमारे १९० च्या घरात पोहोचलेली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये जर संचारबंदी लागू केली तर हातावरचे पोट असणाऱ्यांचे मात्र खूप हाल होणार आहेत. याचा विचार करता फलटण तालुक्यातील सर्व नागरिकांचे असे म्हणता येते की, आपल्याला आता करोना बरोबर जगता आले पाहिजे. ते जेव्हा आपल्याला जगता येईल तेव्हाच आपण या परिस्थितीवर मात करू शकतो. आता सर्व नागरिकांनी शासनाने दिलेले नियम म्हणजेच सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेर पडल्यावर चेहऱ्यावर मास्क वापरणे व वारंवार हात धुणे हे नियमितपणे केले पाहिजे. त्याशिवाय नागरिकांकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही व जर पेशंट आपल्या शहरासह तालुक्यामध्ये वाढले, तर त्याचा सर्वच घटकांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे आता फलटणकर नागरिकांनी करोना या आजाराची काळजी घेऊनच आपले दैनंदिन व्यवहार करणे गरजेचे आहे.
काल (दिनांक २० जुलै) रोजी कोरोनाचे एकूण 40 अहवाल पॉझिटिव्ह
मौजे विंचुर्णी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १३, २० व २१ वर्षांची मुले, ४०, ४०, ४५ व ७० वर्षांच्या महिला आणि १०, १७, १९, १९, व २२ वर्षांच्या मुली (एकूण १२) यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (High-Risk contacts)
गोळीबार मैदान, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३८, ४३, ४६, ५५ व ५८ वर्षीय पुरुष (एकूण ५) यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे (High-Risk Contacts)
सोमवार पेठ, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६० वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे (High-Risk Contacts)
मौजे मिरढे येथील ४५ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (SARI)
मौजे मलठण येथील २७ वर्षीय महिलेची व ७० वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.(SARI)
मौजे सासवड येथील २५ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (High-Risk Contact)
मौजे रावडी खु येथील ३४ वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (SARI)
लक्ष्मीनगर फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १९ वर्षांचा मुलगा ४२, ४५ व ४९ वर्षांचे पुरुष व ४० वर्षांची महिला (एकूण ५) यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (High-Risk contacts)
खामगाव, फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ६२, २४, ५२,२५,२२,७०,व २६ वर्षीय पुरुष आणी ५५, ४५ व २० वर्षीय महिला (एकूण १०) यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे (High-Risk Contacts)
मौजे साखरवाडी येथील ५० वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (SARI)
मौजे सासवड येथील २४ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. (High-Risk Contact)
निकट संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. अशी माहिती प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांनी दिली.