सकाळी सहा वाजताच अधिका-यांसह विकासकामांची पाहणी करणारा आणि जनतेला भेटणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता म्हणजे उपमुख्यमंञी अजितदादा पवार होय.कोणत्याही राजकीय नेत्याने समाजकारण आणि राजकारण करताना वेळेचे नियोजन कसे करावे हे अजितदादांकडून शिकण्यासारखे आहे. म्हणूनच आपल्या कामाच्या जोरावर दादा तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. कोणत्याही कामासाठी आणि कोणाच्या मध्यस्थीशिवाय भेटता येणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा पवार.आपले काम होणारच अशी खात्री बाळगता येणारे नेतृत्व म्हणजे अजितदादा.म्हणूनच कामाचा उरक असणारे आणि धडाडीचा नेता म्हणून उभा महाराष्ट्र दादांकडे पाहत आहे..जनतेच्या आशीर्वादाने मिळालेल्या प्रत्येक पदाचे त्यांनी सोनं केले आहे.यापूर्वीही आणि आताही उपमुख्यमंञीपदावर काम करताना लोकांची अनेक कामे मार्गी लावली आहेत..
कोणतीही व्यक्ती दादांकडे काम घेऊन गेल्यावर ते काम होणार असेल तर लगेच करणार ,नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणून सांगणे ही दादांची खासीयत आहे .लोकांना एखाद्या कामासाठी झुलवत ठेवणे हे त्यांच्या स्वभावात बसत नाही .स्पष्टवक्तेपणा हा दादांचा महत्त्वाचा गुण आहे.काहींना तो फटकळपणा वाटतो. .पण कामाच्या बाबतीत त्यांच्या एवढी धमक असणारा नेता सध्या तरी दिसत नाही.
प्रशासनावर वचक असणारा एकमेव नेता म्हणजे अजितदादा होय.आपल्या खात्याचा आणि त्यातील सर्व भागांचा त्यांचा अभ्यास असतो.त्यामुळे अभ्यासू नेता म्हणून त्यांची ओळख आहे. तत्परतेने निर्णय घेण्यात दादा वाकबगार आहेत.जनतेच्या हिताचे निर्णय करताना ते कधीही विलंब करत नाहीत.म्हणून त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. या कामाच्या जोरावर त्यांनी अनेक माणसे जोडली आहेत.
बोलताना कठोर वाटणारे दादा तितकेच संवेदनशील व प्रेमळ आहेत. महाराष्ट्रात विविध दौरे करताना त्यांना प्रवास करावा लागतो.अशावेळी जर कुठे त्यांच्या समोर एखादा अपघात झाला तर स्वतः हा जखमींना मदत करताना त्यांना आपण अनेक वेळा पाहतो .सामान्य माणसांबद्दल असणारे त्यांचे प्रेम वेळोवेळी अनुभवायला येते .म्हणूनच दादांना ‘जीवाभावाचा माणूस ‘असेही म्हणतात .
बारामती मध्ये आज पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दादांनी विकासकामांचा डोंगर उभा केला आहे .त्याची यादी केली तर खूप लांबलचक होईल.आपल्या कार्यक्षम नेतृत्वाने त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटविला आहे .दादांमध्ये एक सौंदर्यदृष्टी व विकासदृष्टी आहे .याचा प्रत्यय बारामतीमधील विविध कामे पाहताना येतो.
कोणतेही काम नियोजनपूर्व व दर्जेदार करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.
मंत्री म्हणून काम करताना अनेक खात्यांची धुरा सांभाळून अनेक कामे मार्गी लावली.दादांच्या नेतृत्वाखाली शेती,सहकार ,शिक्षण,क्रीडा या व क्षेत्रातील अनेक संस्था त्यांनी नावारुपाला आणल्या.मग ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळ असेल,का-हाटी येथील कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था असेल किंवा तालुक्यातील अनेक सहकारी संस्था असतील. या सर्वांच्या माध्यमातून बारामती आणि परिसराचा कायापालट करण्यात दादांचे मोठे योगदान आहे .बारामतीचा नावलौकिक उंचावण्यात पवार साहेबांइतकाच दादांचा सहभाग आहे .
सतत कामात मग्न असल्यामुळे सत्ता असो अगर नसो दादांभोवती नेहमीच लोकांची गर्दी असते.
दादा स्वच्छता व वृक्षप्रेमी आहेत.बारामती शहरात जागोजागी जी झाडे दिसतात ही सगळी दादांची कृपा म्हणावी लागेल.’आधी केले मग सांगितले’ यानुसार त्यांनी स्वच्छता अभियान आपल्या काटेवाडी गावात राबविले आणि मग इतरांना सांगितले.नंतर स्वच्छता अभिमान ही चळवळच बनली.राजकारण वीस टक्के आणि समाजकारण ऐंशी टक्के ही त्यांची कामाची पद्धत आहे.त्यामुळे राजकीय विरोधकही दादांचे कामाबाबत तोंडभरुन कौतुक करतात.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या काळात त्यांनी अनेक निर्णय धडाडीने घेतले.बारामती ,पुणे ,मुंबई येथे बैठकांचा धडाका लावून प्रशासनाला कामाला लावले.जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यात हयगय होता कामा नये यासाठी अधिकाऱ्यांना कडक सूचना केल्या.कठीण प्रसंगात निर्णय कसे घ्यावेत याचा उत्तम आदर्श म्हणजे अजितदादा.
लॉकडाऊनच्या काळात ज्यांना अनेक अडचणी आल्या त्यांनी थेट अजितदादांशी संपर्क केला.त्या सर्वांच्या अडचणी तातडीने सोडविल्या.चालढकल ,बघू ,करु हे दादांना कधी जमत नाही.याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
एकसष्टी साजरी करणाऱ्या दादांच्या कामाचा झपाटा तरुणांना लाजवेल असाच आहे. सतत नवीन विकासकामांचा ध्यास घेतलेले अजितदादा म्हणजे विकासपुरुषच आहे.
जनतेच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणा-या या नेत्यास ६१ व्या वाढदिवसानिमित्त निरोगी व आनंदी उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा!
*लक्ष्मण जगताप सर ,बारामती*