फलटण : अनेक गोष्टींमध्ये शालेय, क्रीडा, स्पर्धा परीक्षा तसेच कोणत्याही प्रकारचे सामर्थ्य, कौशल्य या सर्वांमध्ये पश्चिम महाराष्ट्र हा अग्रेसर मानला जातो. त्याच्यापाठोपाठ पश्चिम महाराष्ट्रातच असणार्या सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका हा देखील खूप नामांकित आहे. तसेच या सर्व गोष्टीं व्यतिरिक्त निसर्गाला देखील फलटण हे खुप आपुलकीचे वाटू लागले आहे की काय? असे कुतूहल मानवजातीला वाटू लागले. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे वन्यजीव संशोधकांना नुकताच फलटण तालुक्यामधून एका नवीन विंचवाच्या जातीचा शोध लागला आहे. आतापर्यंत भारतामध्ये या कुळातील चारच जातींची नोंद घेण्यात आली होती. वन्यजीव अभ्यासक तसेच संशोधक प्रमुख म्हणून वाइल्ड लाइफ प्रोडक्शन अँड रीसर्च सोसायटीमध्ये कार्यरत असणारे डॉक्टर अमित सय्यद यांनी सातारा जिल्ह्यामध्ये असणारी जैव विविधता अभ्यासण्यासाठी 2008 पासून सुरुवात केली होती. या अभ्यासाअंती 2016 साली सातारा जिल्ह्यातून एकूण 677 प्राण्यांची नोंद करण्यात आली होती. या अभ्यासासाठी सय्यद यांना तब्बल नऊ वर्षे अथक परिश्रम घ्यावे लागले आहेत. अभ्यासामध्ये फुलपाखरे, कोळी, विंचू, साप, पाली, सरडे, मासे, पक्षी तसेच विविध जातीचे सस्तन प्राणी यांचा समावेश केला होता.


