गुणवत्तापूर्ण बि-बियाणे आणि खते मिळावे यासाठी कृषी विभाग दक्ष; खत विकणाऱ्यांनी साठा आणि दर याचे फलक दर्शनी भागात लावावेत – कृषिमंत्री दादासाहेब भुसे

सातारा दि. 23 ( जि. मा. का. ) सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण खते आणि बि – बियाणे मिळावे यासाठी शासन आग्रही असून यावर कृषी विभागाचे लक्ष आहे. प्रत्येक खत, बि – बियाणे विकणाऱ्या दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात दररोज किती साठा आहे आणि दर काय आहेत ठळकपणे फलकावर लावावे अशा सूचना राज्याचे कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी दिल्या
सातारा जिल्ह्यच्या खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. महेश शिंदे,आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील, कृषी विभागाचे कोल्हापूर विभागाचे सहसंचालक दशरथ तांबाळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, प्रभारी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत उपस्थित होते.
शेतकऱ्यांना वर्षभर पुरेल एवढा युरियाचा साठा जिल्ह्याला मिळेल मात्र शेतकऱ्यांनी पीक जोमात येते म्हणून अधिक खताचा मारा करू नये, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होतो. त्यामुळे योग्य ते प्रमाण वापरून उत्पादन कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे असे सांगून नावीन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही प्रोत्साहन देत असल्याचे उदाहरणासह कृषी मंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
सातारा जिल्यातील एक शेतकरी जिरेनियम या सुंगधी लागवड वनस्पतीची लागवड करतो याची माहिती खा. श्रीनिवास पाटील यांनी दिली आणि नैसर्गिक रंगाच्या शेतीला मोठा वाव आहे ही बाब आ. महेश शिंदे यांनी निदर्शनास आणून दिली. या दोन्ही गोष्टी नाविन्यपूर्ण असून राज्याचा कृषिमंत्री म्हणून याबाबतीत काय करता येईल याचा सकारात्मक विचार करू असे यावेळी भुसे यांनी सांगितले.
शहरातील विद्यार्थ्यांना शेती आणि शेतकरी याबाबत फक्त पुस्तकी माहिती असते.त्यांचे प्रत्यक्ष जीवन पाहता यावे म्हणून येणाऱ्या काळात त्यांच्या सहली शेतात घेऊन जाण्याबाबत विचार करत आहोत अशी माहिती कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
यावेळी खा.श्रीनिवास पाटील यांनी काही सूचना केल्या तर आ.महेश शिंदे यांनीही कृषी विभागाचे काम उत्तम सुरु असल्याचे सांगून फुल शेती, हळद शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले. त्यावर शासन पातळीवर योग्य निर्णय घेतले जातील अशी ग्वाही कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी यावेळी दिली.
कृषी मंत्री पोहचले बांधावर
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात ग्राम बीजोत्पादन अंतर्गत उत्पादित सोयाबीन बियाणे पेरणी केलेले उडतारे गावचे सुनील शंकर जगताप या शेतकऱ्याच्या प्लॉटला कृषिमंत्री , खा.श्रीनिवास पाटील, मा.आमदार महेश शिंदे यांनी भेट दिली.यावेळी टोकण पद्धतीने सरीवर सोयाबीन पेरणी केल्याने एकरी फक्त 15 किलो बियाणे लागत असल्याने उत्पादन खर्चात बचत झाल्याचे शेतकऱ्याने सांगितले.तसेच या पद्धतीने एकरी उत्पादन 20 क्विंटल घेतल्याचे सांगितले.यावेळी सोयाबीन पिकाची उगवण 100 टक्के झालेली असल्याने कृषीमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी विभागीय कृषी सहसंचालक दशरथ तांभाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी जयवंत कवडे, तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, शेतकरी उपस्थित होते.

PHALTAN TODAY
बातमी व्यवस्था बदलणारी
आपल्या भागातील घडामोडीच्या बातम्यांसाठी संपर्क-
प्रविण काकडे (सर) 9922931066
आनंद पवार (सर) 96733 23195
राहुल पवार 96658 24007
अमोल नाळे (सर) 9923150015
आपल्या जिल्ह्यातील  बातम्या पाहण्यासाठी वरील नंबर आपल्या ग्रूपमध्ये ॲड करा.. आणि बातम्या शेअर करायला विसरु नका..!

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!