सातारा दि. 12 ( जि. मा. का ) : कोरोना संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून बाहेर जिल्ह्यातून विशेषत: मुंबई व पुणे मधून सातारा जिल्ह्यातील विविध गावांमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याबाबत ग्रामस्तरीय समितीने करावयाच्या उपाययोजना व उचित निर्णय घेण्याकामी अलाहिदा ग्रामस्तरीय समिती गठीत करुन सूचना पारित केल्या होत्या आणखी उपायोजना करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खालील प्रमाणे उपाययोजना करण्याबाबत अध्यक्ष ग्रामस्तरीय समितीस कळविले आहे.
मे महिन्यामधील कोरानामुळे मृत्यु पावलेल्या व्यक्तींचा अभ्यास केला असता, बऱ्याच व्यक्ती कोरोना आजराच्या अंतिम टप्प्यात हॉस्पीटलकडे येतात. त्यापैकी काही व्यक्तीचा स्वत:चे घर ते हॉस्पीटल या प्रवासात मृत्यु झाला किंवा काही जणांचा हॉस्पीटला आल्यानंतर तात्काळ मृत्यु झाला. याचा अर्थ नागरिकांनी कोरोना लक्षणे दिसल्यानंतर डॉक्टरांना भेटून उपचार करुन घेतलेले नाहीत.
बाहेरुन गावात येणारी व्यक्ती ही आपल्या गावातील नागरिक आहे. आपल्यापैकी कोणाची ना कोणाची तरी ती व्यक्ती भाऊ, बहिण, चुलता, चलुती, आई, वडील अशा जवळच्या नात्यातील आहे. बाहेरुन आल्यानंतर सामाजिक दडपणामुळे या व्यक्ती स्वत:चा आजार सांगत नाहीत. त्यामुळे ती व्यक्ती कोरोना आजारात अंतिम टप्प्याकडे जाते. तरी सर्व ग्रामस्तरीय समिती यांना आपल्या गावात येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपला बांधव आहे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांच्या आरोग्याची गापवतळीवर माहिती घ्यावी. जर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना पाठवून आवश्यक असणारा उपचार करुन घ्यावा. आपल्या गावातील एकही व्यक्ती कोरोनामुळे मृत पावणार नाही याची दक्षता व काळजी घ्यावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.