सातारा दि.3 (जिमाका) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पूर्वमशागतीच्या कामांना वेग आला असून खरीप हंगाम पूर्वतयारी अंतिम टप्यात आली असून खते व बियाणांच्या वाटपाचे योग्य नियोजन करावे तसेच टोळधाड या किडीच्या प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी कृषी विभागाने टोळधाड किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचवली पाहिजे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या.
सातारा जिल्हा खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी उपस्थित होते.
खरीप 2020 साठी 102923 मे.टन एवढया खतांचे आवंटन जिल्हयासाठी मंजूर आहे. त्यापैकी माहे मे 2020 अखेर पुरवठा 30300 मे.टन इतका झालेला आहे. मागील शिल्लक मिळून एकूण उपलब्धता 59943 मे.टन इतकी आहे. 1 एप्रिल 2020 पासून ची विक्री 47173 मे.टन इतकी आहे. सद्यस्थितीत 25857.74 मे.टन इतका खतांचा साठा उपलब्ध आहे. त्यामध्ये युरिआ-5267 मे.टन, डीएपी-3819 मे.टन, एमओपी-2598 मे.टन, एसएसपी-1027.2 मे.टन, एनपीके-13144 मे.टन उपलब्ध आहे. खतांच्या बाबतीमध्ये युरियासाठी मागणी तुलनेने जास्त प्रमाणात आहे. जूनच्या पहिल्या आठवडयात जिल्हयास 3700 मे.टन युरिया उपलब्ध होणार आहे व जूनच्या दुसऱ्या आठवडयात 3000 मे.टन युरिया उपलब्ध होणार आहे. सद्यस्थितीत युरिया व इतर सर्व खतांचा पुरेसा साठा जिल्हयात उपलब्ध असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले.
बियाणे बाबतीत सातारा जिल्हयाची बियाणे मागणी 47804 क्विंटल इतकी आहे. त्यापैकी प्रमुख पिके सोयाबीनची मागणी 17063 क्विंटल इतकी आहे. त्यापैकी आजअखेर महाबीज – 2883 क्विंटल व खासगी कंपन्या 8361.65 क्विंटल व इतर असे एकूण 11309.35 क्विंटल इतकी बियाणे उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी 4362.45 क्विंटल बियाण्याची विक्री झालेली आहे व 6946.90 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे. भात पिकाचे बियाणे जिल्ह्याची मागणी 13000 क्विंटल इतकी आहे. यापैकी महाबीज-1684.65 क्विंटल, एनएससी-110 क्विंटल, खासगी 4313.26 क्विंटल, इतर-230 क्विंटल असे एकूण 6337.91 क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे. त्यापैकी आजअखेर 2933.60 क्विंटल बियाण्याची विक्री झालेली आहे. सद्यस्थितीत 3404.31 क्विंटल बियाणे विक्रीसाठी शिल्लक आहे, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी या बैठकीत सांगितले.
कृषि विभागामार्फत बांधावर खत व बियाणे वाटप मोहिमे अंतर्गत सातारा जिल्हयात आजअखेर 933 शेतकरी गटांमार्फत 4073.80 मे.टन खते व 1975.23 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहे. पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी अवलंब करावा यासाठी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार शेतकऱ्यांना शेतीशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. सन 2020-21 या वर्षामध्ये मका-114, सोयाबीन-175, भात-69, ऊस-40 अशा एकूण 398 शेतीशाळा घेणेचे नियोजन केलेले आहे. सद्यस्थितीत शेतीशाळांचा पहिला, दुसरा वर्ग सुरु असून यामध्ये शेतकरी निवड, जमीन आरोग्यपत्रिकेनुसार खतांचा वापर, सोयाबीन सारख्या पिकात घरच्या बियाण्यासाठी उगवणक्षमता तपासणी, बुरशीनाशके, किटकनाशके, जिवाणूखते, बीजप्रक्रिया इ.बाबत मार्गदर्शन करण्यात येत असल्याचेही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.
कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल कृषी विभागाच्या सहकार्यातून 442 गटांच्या माध्यमातून 37683 क्विंटल भाजीपाला व 25417 क्विंटल फळे यांची थेट ग्राहकांना विक्री करण्यात आली.
टोळधाड प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. टोळ रात्रीच्या वेळी झाडाझुडपांवर जमा होतात. अशावेळी प्रादुर्भावग्रस्त शेतात मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारीत किटकनाशक ॲझाडिरेक्टीन 1500 पी.पी.एम. 30 मि.ली. किंवा 5% निंबोळी अर्काची प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी. या किडीच्या नियंत्रणासाठी विष अमिषाचा वापरही प्रभावी ठरतो. 20 किलो गहू किंवा भाताचे तूसामध्ये फिप्रोनिल 5 एस.सी. 3 मि.ली. मिसळून त्याचे ढीग शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. याकडे टोळ आकर्षित होतात आणि मरुन जातात. टोळधाड किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आल्यास एच.टी.पी. पंपाद्वारे किंवा फायरब्रिगेड यंत्रणेमार्फत किटकनाशकांची फवारणी करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा प्रशासनामार्फत सज्ज ठेवण्यात आली आहे, असेही प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. राऊत यांनी या बैठकीत सांगितले.