शेतकऱ्यांनी टोळधाड प्रतिबंधासाठी सज्ज रहावे – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी
सातारा दि. 30 (जिमाका) : राज्यामधील अमरावती व नागपूर जिल्ह्यामध्ये वाळवंटी टोळ किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून या टोळांचे थवे ताशी 12 ते 16 किमी. वेगाने उडतात. यामुळे किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी कालावधीत मोठ्या क्षेत्रावर होवू शकतो. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
वाळवंटी टोळाच्या जिवनक्रमामध्ये अंडी, पिले अगर बाल्यावस्था व प्रौढ अशा प्रमुख तीन वाढीच्या अवस्था आहेत. वाळवंटी टोळांची पिल्ले एकत्र येऊन मोठ्या थव्याने वाटेतील वनस्पतींचा फडशा उडवत पुढे सरकतात. अशी टोळधाड पिकांचे जास्तीत जास्त नुकसान करते शिवाय ही टोळधाड दुरवर उडून जात असल्याने पिकांना या किडीपासून मोठा धोका असतो. वाळवंटी टोळ किडीची आर्थिक नुकसान पातळी ही 10,000 प्रौढ प्रती हेक्टरी किंवा 5 ते 6 पिल्ले प्रती झुडूप अशी आहे. या पैकी कोणतीही स्थिती उद्भवल्यास तातडीने किडींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे.
टोळधाड प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी सामुहीक प्रयत्न करणे आवश्यक आहे. टोळ रात्रीच्या वेळी झाडाझुडुपांवर जमा होतात. अशा वेळी प्रादूर्भावग्रस्त शेतात मशाली पेटवून तसेच टायर जाळून धुर केल्यास नियंत्रण होते. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारीत किटकनाशक आझाडिरेक्टीन 1500 पी पी एम 30 मिली किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची प्रति 10 लि. पाण्यातून फवारणी करावी.
वाळवंटी टोळ किडीच्या नियंत्रणासाठी विष अमिषाचा वापर सुद्धा प्रभावी ठरतो. टोळ किडीसाठी 20 किलो गहू किंवा भाताचे तूसामध्ये फिप्रोनील 5 एस सी 3 मिली मिसळून त्याचे ढीग शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. या कडे टोळ आकर्षीत होतात आणि मरुन जातात.
वाळवंटी टोळाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास केंद्रीय किटकनाशक बोर्डाने सुचविल्याप्रमाणे प्रति 10 लीटर पाण्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 24 मिली किंवा डेल्टामेथ्रीन 2.8 टक्के प्रवाही 10 मिली किंवा लॅबडा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 10 मिली किंवा फिप्रोनिल 5 एस.सी. 2.5 मिली या पैकी कोणतेही एक किटकनाशक मिसळून फवारणी करावी.
या किडीबाबत शेतकऱ्यांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक असून क्षेत्रीय स्तरावर वाळवंटी टोळांचा प्रादूर्भाव आढळल्यास शेतकऱ्यांनी टोळधाड प्रतिबंधासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात वाळवंटी टोळ नियंत्रणाबाबत अधिक माहिती साठी क्षेत्रीय स्तरावरील कृषि विभागाचे कर्मचारी व अधिकारी तसेच नजिकच्या कृषि विज्ञान केंद्राशी संपर्क साधवा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे