सातारा दि. 22 (जिमाका) : कोविड-19 मुळे सातारा जिल्ह्यातील विविध उद्योगधंदे पूर्ण क्षमतेने सुरु नाहीत. येथील मजुरांना तसेच विविध शहरातून सातारा जिल्ह्यामध्ये स्थलांतरीत झालेल्या काही मजुरांना रोजगार नाही. या मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोगार हमी योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होवु शकतो. यासाठी कृषी विभागामार्फत फळबाग लागवड गांडुळ युनिट, नॅडेप कंपोष्ट युनिट, शेततळे या घटकाच्या माध्यमातुन मजुरांना काम देता येणे शक्य आहे. ही योजना केंद्र शासनाची असून वर्षात एका कुटुंबाला 100 दिवसाचा रोजगार देण्यात येतो. दि. 1 एप्रिल पासून प्रती दिवस मजुरीचा दर 238/- रुपये इतका झालेला आहे. तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी गावपातळीवर कृषि सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
नोकरी इच्छुक उमेदवारांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन
सातारा दि. (जिमाका) : सातारा जिल्ह्यात नोकरी इच्छुक उमेदवारांना नावनोंदणी करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत www.mahaswyam.gov.in हे वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टलमार्फत नोकरीइच्छुक उमेदवार नावनोंदणी विनामूल्य व घर बसल्या करु शकतात. त्यासाठी उमेदवारांनी या कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. तरी जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांनी आपली नोंदणी www.rojgar.mahaswyam.gov.in या वेबपोर्टलवर करावी. विशेषत: परराज्यातून, परजिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात परतलेल्या व नोकरीसाठी इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी या वेबपोर्टलद्वारे आपली नाव नोंदणी, नुतनीकरण, आपल्या प्रोफाईलमधील आवश्यक ते बदल करुन घ्यावेत, असे आवाहजन सहाय आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, सातारा सचिन जाधव यांनी केले आहे.