कारागृहातील बाधित 2 रुग्ण झाले पूर्णपणे बरे; 90 जणांना केले दाखल
सातारा दि. 19 (जिमाका) : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 31 व 58 वर्षीय जिल्हा कारागृहातील 2 कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने या 2 रुग्णांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचित्किस डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
90 जणांना केले दाखल
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 24, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 32, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 14, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 12 व ग्रामीण रुग्णालय, वाई येथे 8 असे एकूण 90 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.
सध्या सातारा येथे 25, सह्याद्री हॉस्पीटल, कराड येथे 10 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 33 असे एकूण 68 कोविड-19 बाधित रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 66 जणांचे लक्षणे विरहित किंवा सौम्य लक्षणे असलेली असून उर्वरित 2 रुग्णास मध्यम स्वरुपाची लक्षणे आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 146 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 69 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 75 आहे तर मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.