नारायणगड :- जुन्नर तालुक्यातील एक गड

नारायणगड
नारायणगड हा जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावजवळ  राष्ट्रीय महामार्ग ६०च्या पूर्वेला आहे. या गडावर पुरातन लेणे व पाण्याची टाके आहेत. या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते असे सांगितले जाते. खोडद गावाच्या उत्तरेला ” नारायणगड ” आहे. त्याच्या कुशीत गडाचीवाडी नावाची वस्ती वसलेली आहे. नारायणगड हा किल्ला किल्ल्यांच्या तीनप्रकारापैकी गिरिदुर्ग या प्रकारामध्ये समाविष्ट होतो. पुणे जिल्ह्या मध्ये पुणे – नाशिक महामार्ग वर पुणे शहरापासून ९० कि.मी अंतरा वरील नारायणगाव या गावा पासून पूर्वेस १० कि.मी अंतरवर माळवाडी (खोडद) तेथून उत्तरेस साधारण४ कि.मी नारायणगड आहे हा किल्ला समुद्र सपाटीपासून ८७६ मीटर उंचीवर आहे. नारायणगाव ते खोडद अत्यंत निसर्गरम्य परिसर आहे. मुळात ‘नारायणगड ‘ हा किल्ला दूरवरून ओळखला जातो तो त्याच्या दोन शिखरांमुळेच नारायणगडाच्या कुशीतील वसलेली गडाचीवाडी बहुदा या वस्तीचे नाव गडा शेजारी वसलेली आहे म्हणून पडलेले असावे. तेथून गडावर जायला रस्ता आहे. नारायणगडाच्या पायथ्याला मुकाईमातेचे सुंदर मंदिर आहे तेथे पाण्याची मोठी टाकी देखील बसवलेली आहे. दुरवर दिसणारा शिवनेरी आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या अंबा अंबालिका लेण्यांचा डोंगर मुळातच जुन्नर या शहराचा चा इतिहास अत्यंत प्राचीन त्याच्या शेजारी असलेला नारायणगड हा किल्ला मध्ययुगातील आहे असे अनुमान आपण लावू शकतो. ‘मुकाई ‘ मंदिराच्या मागून गडावर जायला सुंदर पायवाट आहे. अलीकडील काळात तेथे नवीन दगडी पायऱ्या बसविण्यात आल्या आहे. नारायणगडावर जाताना जास्त झाडी आजिबात नसल्याने गड थोडासा उजाड असल्यासारखा वाटतो. किल्याच्या पायवाटेवर बोरीची झाडे आणि बाभळीची झाडे आपल्या स्वागताला तयार असतातच. यावाटेवरून थोडे पुढे गेले असता आपल्याला काळात खोदून काढलेल्या पायऱ्या दिसतात. यापायऱ्या आजही चांगल्या स्थितीमध्ये असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि तेथे काही नवीन दगडी सिमेंट मध्ये बांधकाम केलेल्या पायऱ्या आहे. या काळात खोदलेल्या पायऱ्यांची साथ आपल्याला शेवट पर्यंत मिळते. भौगोलिक दृष्ट्या ‘ नारायणगडाकडे ‘ पहिले तर हा किल्ला उंचीने अगदी छोटा आहे परंतु किल्याला चारही बाजूने नैसर्गिक कातळकडा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे जास्त तटबंदी किल्याला दिसत नाही. आपल्याला बुरुजांचे अवशेष आणि तटबंदीच्या खुणा देखील पाहायला मिळतात. किल्यावर पूर्वी ‘ नारायणाची ‘ मूर्ती होती असे काही उल्लेख देखील मिळतात. संपूर्ण किल्ला पहात पाहत एकदाचे किल्याच्या माथ्यावर प्रवेश केल्यावर समोरची दृश्य बघण्यासारखी होती. उत्तरेच्या बाजूस दुरवर दिसणारा अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे स्थान असणाऱ्या ‘ओझरचा तलाव ‘ आणि त्यावर असलेली धुक्याची झालर विलोभनीय दिसते. तसेच किल्याच्या माथ्यावरून ‘शिवनेरी ‘ धुक्यातून हळूच मान वर काढून ‘ जुन्नर ‘ या प्राचीन आर्थिक राजधानी वर लक्ष देत होता. तसेच दक्षिणेस खोडदगावाचे आणि GMRT च्या दुर्बिण दिसतात.या गडमाथ्याच्या येथून दोन पायवाटा फुटतात एक पायवाट डाव्या बाजूला वर चढत जाते आणि दुसरी पायवाट उजव्या हाताला जरा झाडीत वळते.’ नारायणगडाच्या ‘ माथ्यावर सगळीकडे खुरटे गवत मोठ्या प्रमाणात आढळते. परंतु लोकांच्या येण्याजाण्यामुळे याठिकाणी पाउलवाटा पडलेल्या आहेत. आपण या मुख्य वाटेवरून चालत गेले असता आपल्याला एक पाण्याचे कोरडे टाके दिसते. आज हे टाके जवळपास बुजलेल्या अवस्थेत होते परंतु काही दिवसांपूर्वी काही निसर्ग प्रेमीनी त्या साफ केल्या आहे येथून अगदी पाच ते दहा पावले चालल्यावर आपण एका उंचवट्यावर उभे राहतो तेथून किल्यावर नजर टाकली तर किल्याचा संपूर्ण परिसर न्याहाळता येतो. येथून पुढे चालत गेल्यावर गडाच्या सर्वोच्च शिखरावर म्हणजे ‘हस्ताबाई ‘ या देवीच्या मंदिरात जाऊन पोहोचलोमंदिरातील ‘ हस्ताबाई ‘ या देवतेची मूर्ती अत्यंत देखणी आहे. नागपंचमी ला व दसऱ्याला हस्ताबाईची मोठी जत्रा गडावर भरते. हि मूर्ती शस्त्र सज्ज असल्याची आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या समोर एक जुनी दगडी दीपमाळ देखील बघण्यासारखी आहे. या गडदेवतेचे दर्शन घेऊन या मंदिराच्या मागे जाऊन उभे राहिले कि जो काही ‘ जुन्नर आणि सह्याद्रीचा ‘ नजारा बघायला मिळतो तो कितीही डोळ्यात साठवायचा प्रयत्न केला तरी तो कमीच असतो. परत तेथून त्या कोरड्या पाण्याच्या टाक्या पर्यंत आल्यास आणि डाव्या हाताच्या झाडीत शिरलो तेथे काही चौथऱ्यासारखे अवशेष पाहायला मिळतात. तसेच येथून थोडे पुढे चालत गेले असता पूर्वीच्या काळात खोदलेले एक सुंदर टाके बघायला मिळते. या किल्यावर अनेक छोटे मोठे चढ उतार बघायला मिळतात आणि त्याच्यावर वाढलेल्या गवतामुळे किल्याचे बरेचसे अवशेष हे गवतामधून शोधावे लागतात. येथून पुढे चालत गेले असता एक सुंदर टाके बघायला मिळाले जमिनीशी समतल असलेले हे पाण्याचेटाके ‘ नारायण टाके ‘ म्हणून सगळीकडे ओळखले जाते. तसेच या टाक्याच्या मागच्या बाजूस एक मोडी शिलालेख देखील बघायला मिळतो. हे टाके त्या काळात अत्यंत सुंदर रीतीने खोदलेले आहे. हे टाके पाहून झाल्यावर गडाच्या पूर्व दिशेला सलग पाच पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहायला मिळतो.
नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथाच्या कालावधीत सुरु झाला. किल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथाच्या कालखंडात बांधली गेली. गडाचे बाकीचे काम नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पूर्ण झाले. याची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशीमध्ये आहे. पहिल्या बाजीराव पेशव्यांचा नारायणगडाशी जवळचा संबंध होता. बाळाजी विश्वनाथाच्या मृत्यूनंतर छत्रपती शाहूंनी पेशवे पदाची सूत्रे बाजीरावा कडे सोपवली तेव्हा नारायणगाव आणि नारायणगडाचा सरंजाम त्याला दिल्याचे पत्रांमध्ये उल्लेख सापडतात. इ.स.१६०५ पासून जुन्नर परगण्याचा ताबा मालोजीराजांकडे होता. शाहजी महाराजांनी अनेकदा आपली नोकरी बदलली मात्र जुन्नर – नारायणगाव ते चाकाण पर्यंत च्या परिसराचा ताबा सोडला नाही. जुन्नर परगण्या मध्ये नारायणगड आणि खोडद गावाचा समावेश होतो. नारायणगडाचा किल्ला म्हणून वापर बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत सुरु झाला.किल्ल्याची तटबंदी बाळाजी विश्वनाथांच्या कालवधीत झाली.हे काम नानासाहेब पेशव्यांच्या कारकिर्दीत पुर्ण झाली त्या विषयीची नोंद नानासाहेब पेशव्यांच्या रोजनिशी मध्ये आली आहे. नानासाहेब उर्फ बाळाजी बाजीरावपेशव्याच्या कालावधीत पेशवाईची आर्थिक कारभार सदाशिवभाऊकडे होता सदाशिवभाऊ आर्थिक व्यवहारामध्ये दक्ष होता. इ.स.१७५८ मधील नारायणगडाचा आर्थिक हिशेब आपणाकडे तातडीने सादर करावा हा त्यांचा सक्तीचा आदेश चिटणीसी दप्तरामध्ये आहे. १९४२ मध्ये महात्मा गांधीच्या “भारत छोडो ” या आंदोलनाला या गावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.माजी पोलीस पाटील कै.रावजी पाटील काळे, श्री बाळा पाटील गायकवाड यांच्या समवेत ग्रामस्थांनी नारायणगडा वर राष्ट्रध्वज फडकविला होता. हि माहिती कळल्यावर इंग्रज पोलीस त्या गावकऱ्यांच्या शोधात खोडद गावामध्ये आले होते. पण गावकर्यानि त्या बाबत कहिहि माहिती दिली नाही.
गडावर पाहण्यासाठी मुकाई मातेचे मंदिर , हस्तमाता मंदिर ,किल्लेदार वाडा (गणेश पट्टी, शरभ शिल्प) , पाणी टाकी समूह ,नारायण टाके , चोर दिंडी आणि  बुरुज आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!