फलटण : पत्रकारिता, समाजकारण आणि शैक्षणिक क्रांतीमध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी मोलाचे कार्य केले. अवघ्या 34 वर्षाच्या आयुष्यातील विविध क्षेत्रातील त्यांची घोडदौड उल्लेखनीय होती. पत्रकार विविधांगी असतो हे बाळशास्त्री जांभेकरांनी लोकांना दाखवून दिले. स्वातंत्र्य चळवळीच्या अगोदर जांभेकरांनी समाज सुधारणा, शिक्षण यासाठी पत्रकारितेचे माध्यम सुरु केले. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात टिळक, आगरकर यांसारख्या समाजधुरिणांनी आपल्या पत्रकारितेतून लोकांना स्वातंत्र्याच मोल सांगितले. याचप्रमाणे स्वातंत्र्योत्तर काळातही पत्रकारांचे समाजाप्रती मोठे योगदान आहे. याची जाणीव शासन, प्रशासन व जनता या सर्वांना आहे. त्यातूनच लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही अतिशय खंबीरपणे उभा आहे, असे मत सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी व्यक्त केले.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या 174 व्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने झूम अॅपद्वारे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून युवराज पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
युवराज पाटील पुढे म्हणाले, बाळशास्त्री जांभेकरांच्या ज्ञानाचा व संशोधनाचा आवाका प्रचंड मोठा होता. अनेक लिप्यांचे अभ्यासक असल्यामुळे महाराष्ट्रातील प्राचीन शिलालेख आणि ताम्रपट यांचा अभ्यास करून त्यांनी शोध निबंध लिहले. त्यामुळे भारतातील पुरातत्व विषयाचे पहिले अभ्यासक म्हणूनही त्यांचं नाव आहेच. संत ज्ञानेश्वरांनी लिहलेली ज्ञानेश्वरी मराठीतून मुद्रित करून समस्त मराठी भाषिकांच्या घराघरात ज्ञानेश्वरी पोहचविण्याला मोठा हातभारही जांभेकरांनी लावला. गणित आणि खगोलशास्त्रातली त्यांची गती ओळखून तत्कालीन सरकारने त्यांना कुलाबा वेध शाळेचे संचालक म्हणूनही नियुक्त केलं होतं.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी जांभेकरांच्या स्मारकाचे आणि विविध उपक्रमातून त्यांच्या स्मरण कार्याचे करीत असलेले कार्य प्रेरणादायी व अभिमानास्पद असल्याचे सांगून, आज मुद्रीत माध्यमांची संक्रमण अवस्था सुरु आहे. डिजीटल मिडीया हे त्यांच्यासाठी आव्हान नसून ती एक संधी आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपणही काळानुसार बदलले पाहिजे. बदलत्या काळात पत्रकारांनी आता स्मार्ट फोन जर्नालिझमवर भर द्यावा असे सांगून बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीमधून आपण विधायक पत्रकारितेचा वसा घेवूयात, असेही शेवटी युवराज पाटील सांगितले.
रविंद्र बेडकिहाळ म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पोंभुर्ले येथील बाळशास्त्रींच्या पुण्यतिथी कार्यक्रमाची 28 वर्षांची परंपरा खंडित झाली याची खंत आहे. तथापि डिजीटल माध्यमातून जांभेकरांना आदरांजली वाहण्याचे समाधान मिळाले. मुंबई ही बाळशास्त्री जांभेकरांची कर्मभूमी होती. परंतु आज 174 वर्षानंतरही तेथे जांभेकरांचे स्मारक नाही. आम्ही महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे स्मारक उभारले व विविध उपक्रमातून जांभेकरांची स्मृती जपत आहोत. आता मुंबईतील पत्रकार संघटना, विविध वृत्तपत्रांचे ज्येष्ठ संपादक, पत्रकार यांच्या माध्यमातून जांभेकरांच्या कर्तृत्त्वाला साजेसे असे स्मारक मुंबईत उभारण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करु.
सध्याच्या ‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर प्रदीर्घ लॉकडाऊनमुळे जिल्हा पातळीवरील वृत्तपत्रे, त्यांचे संपादक, पत्रकार आर्थिक हलाखीत आहेत. त्यांच्यासाठी राज्य शासनाने सहाय्य म्हणून विशेष आर्थिक पॅकेज द्यावे यासाठीही आम्ही महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व समविचारी पत्रकार संघटनांच्या माध्यमातून पाठपुरावा करु, असेही बेडकिहाळ यांनी शेवटी सांगितले.
अरविंद मेहता म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाळशास्त्रींच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम स्थगित झाला असला तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आयोजित केलेला आजचा कार्यक्रम स्तुत्य असल्याचे सांगून या निमित्ताने पत्रकारांना उद्बोधक विचार मिळाल्याचे नमूद केले. डॉ.विद्येश गंधे यांनी बाळशास्त्रींचे कार्य पत्रकारितेबरोबरच शिक्षण क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. पत्रकार चैतन्य रुद्रभटे यांनी आजच्या डिजिटल युगातही मागे न राहता ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ यांनी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी च्या माध्यमातून उभे केलेले हे काम निश्चितच तरुण पिढीला दिशादर्शक आहे. आगामी काळात राज्यस्तरावरील पत्रकारांसाठी एक झूम कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम राबविण्यात यावा व राज्यातील पत्रकारांना एक नवा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. विजय मांडके सर्व उपस्थितांचे आभार मानले.
प्रारंभी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या फलटण येथील मुख्य कार्यालयात रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या ऑनलाईन कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार पत्रकार शशिकांत नारकर, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या विश्वस्त सौ.अलका बेडकिहाळ, अमर शेंडे, गजानन पारखे, अशोक खांबेकर, डॉ.समीर नाडगौडा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कानिफनाथ ननावरे, पत्रकार विक्रम चोरमले, विजय पाटील, प्रदीप चव्हाण, भारद्वाज बेडकिहाळ, रोहित वाकडे, मयुर देशपांडे, प्रसन्न रुद्रभटे, गौरव वाकडे आदींनी भाग घेतला.
पोंभुर्ले येथे ‘दर्पण’कारांना अभिवादन
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने पोंभुर्ले, ता.देवगड येथे उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात शासनाचे निर्बंध पाळून बाळशास्त्री जांभेकरांच्या अर्धपुतळ्यास पोंभुर्ले ग्रामपंचायत व जांभेकर कुटूंबिय यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सादीक डोंगरकर, सुधाकर जांभेकर, बाजीराव जांभेकर यांची उपस्थिती होती.
फोटो कॅप्शन –
1) ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पुण्यतिथीदिनी अभिवादन करताना रविंद्र बेडकिहाळ. समवेत भारद्वाज बेडकिहाळ, कानिफनाथ ननावरे, प्रसन्न रुद्रभटे, अमर शेंडे.
2) ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डिजीटल माध्यमातून संवाद साधताना सातारा जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील.