यंदाच्या वर्षी कोरोनाच्या विघ्नामुळे जगात, देशात, राज्यात अनेक परंपरा खंडित झाल्या आहेत. राज्यापुरता विचार करायचा झाला तर अनेक गावोगावच्या यात्रा, महापुरुषांच्या जयंतीचे उत्सव, त्यानिमित्त आयोजित होणारे सार्वजनिक कार्यक्रम अशा अनेक जिव्हाळ्याच्या गोष्टी यंदा आपण मुकलो आहोत. आता तर लाखो वैष्णवांना ज्याची ओढ असते अशी जागतिक किर्तीची पंढरपूरची आषाढी वारी आणि तमाम अबाल वृद्धांना ज्याची वर्षभर आस लागून राहिलेली असते तो सार्वजनिक गणेशोत्सवही परंपरेप्रमाणे साजरा होऊ शकेल की नाही अशी शंका आहे. या सार्या पार्श्वभूमीवर मराठी वृत्तपत्रसृष्टीसाठी भूषणावह असणारी बाळशास्त्रींना पुण्यतिथी दिनी त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथील ‘दर्पण’ सभागृहात अभिवादन करण्याची तब्बल 28 वर्षांची एक परंपरा खंडित झाल्याची खंत मनाला रुखरुख लावणारी आहे.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया रचणारे ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची दिनांक 17 मे रोजी पुण्यतिथी आहे. बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ या पहिल्या मराठी वृत्तपत्राचा व ‘दिग्दर्शन’ या पहिल्या मराठी मासिकाचा शुभारंभ करुन मराठी वृत्तपत्रसृष्टीला दिशा देण्याचे काम केले. पहिले असिस्टंट प्रोफेसर (नोव्हेंबर 1834), ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ या पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक (सन 1845), नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपीठाचे संस्थापक, पहिले मराठी शाळा तपासणीस (पहिले शिक्षणाधिकारी) (सन 1844 ते 1855), पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक (1845), पहिल्या अध्यापक वर्गाचे संचालक (यावरून आजच्या डी.एड. व बी.एड. कॉलेजची संकल्पना त्याकाळात आचार्यांनी मांडल्याचे लक्षात येते) (सन 1845) याशिवाय पहिले दूरदृष्टीचे समाजसुधारक, महाराष्ट्राचे आद्यशिक्षण तज्ञ, इतिहास संशोधक म्हणूनही बाळशास्त्री जांभेकरांचा उल्लेख अभिमानाने केला जातो. अशा या महापुरुषाचे विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्मरण कार्य महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या संस्थेच्यामार्फत गेली 32 वर्षे सातत्याने सुरु आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांची बाळशास्त्रींच्या कार्यकर्तृत्त्वाविषयी असलेली निस्सीम श्रद्धा या सातत्याच्या मागची खरी शक्ती आहे.
बाळशास्त्री जांभेकरांची जन्मभूमी कोकण तर कर्मभूमी मुंबई. मात्र कोकणापासून मुंबईपर्यंत बाळशास्त्रींच्या कार्याचा, समाजसुधारणेतील त्यांच्या योगदानाचा, शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या बौद्धीक लौकीकाचा, भाषा शास्त्रातील त्यांच्या संशोधनाचा योग्य तो मरणोत्तर सन्मान इतर महापुरुषांच्या तुलनेत बाळशास्त्रींच्या वाट्याला काहीच आला नव्हता. नेमकी हीच गोष्ट रविंद्र बेडकिहाळ यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बाळशास्त्रींच्या संपूर्ण चरित्राचा सखोल अभ्यास केला. बाळशास्त्रींचे कार्य नव्याने समाजासमोर आणण्यासाठी, पत्रकारितासृष्टीला त्यांच्या कार्याच्या आदर्शाची जाणीव करुन देण्यासाठी, बाळशास्त्रींसमोर नतमस्तक होण्यासाठी त्यांचे स्मारक हवे ही कल्पना यातून पुढे आली. त्यानंतर कोकणातील अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणार्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या बाळशास्त्रींच्या जन्मगावी सन 1992 रोजी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे पदाधिकारी, विश्वस्त पोचले आणि तिथपासून पोंभुर्ले येथे प्रतीवर्षी जावून बाळशास्त्रींसमोर नतमस्तक होण्याची परंपरा सुरु झाली.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सन 1992 ला पोंभुर्ले येथे बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारक प्रकल्पाचे काम सुरु झाले. 1994 साली स्मारकाचा पहिला टप्पा, त्यानंतर 1996 साली बाळशास्त्रींच्या ब्रांझच्या पुतळ्याची स्थापना व त्यानंतर 2004 साली बाळशास्त्रींचे संपूर्ण देशातील व मराठी वृत्तपत्रसृष्टीला अभिमान वाटावे असे पहिले स्मारक महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने उभे केले. स्मारक प्रकल्पाचे हे काम सुरु असताना 6 जानेवारी राज्यस्तरीय पत्रकार दिन व 17 मे बाळशास्त्री जांभेकर पुण्यतिथी असे दोन कार्यक्रम सन 1992 पासून अव्याहतपणे संस्थेच्या मार्फत या ठिकाणी आजवर होत आले आहेत.
विशेष म्हणजे सन 2004 साली या ठिकाणी ‘दर्पण’ सभागृहाचे उद्घाटन झाल्यानंतर संस्थेच्यावतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारही याच ठिकाणी वितरित होतात. तसेच दिनांक 17 मे रोजी बाळशास्त्रींना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमही मान्यवरांच्या उपस्थितीत प्रतीवर्षी पार पडतो. आजवर अनेक मान्यवर राजकीय नेते, साहित्यिक, पत्रकार, शिक्षणतज्ञांनी या कार्यक्रमांच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित राहून बाळशास्त्रींना अभिवादन केले आहे. यामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर जोशी, ज्येष्ठ साहित्यिक रविंद्र भट, रविंद्र पिंगे, मधुमंगेश कर्णिक, विद्याधर गोखले, नारायण सुर्वे, विश्वास मेहेंदळे, केशव मेश्राम, ज्येष्ठ विचारवंत अरुण साधू, विजय कुवळेकर, तत्कालिन मंत्री रविशेठ पाटील, विजय गिरकर, सुरेश प्रभू, सुनिल तटकरे, हसन मुश्रीफ, तत्कालिन राज्यमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, तत्कालिन आमदार आप्पासाहेब गोगटे, प्रमोद जठार, श्रीमती फौजिया खान, ज्येष्ठ विचारवंत डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.सदानंद मोरे, डॉ.श्रीपाल सबनीस, शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ.एन.जे.पवार, डॉ.देवानंद शिंदे, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे तत्कालिन अध्यक्ष हरिभाऊ निंबाळकर, ज्येष्ठ संपादक प्रतापसिंह जाधव, अनंत दिक्षीत, राजाभाऊ लिमये, सुकृत खांडेकर, एस.एम.देशमुख, राज्य प्रसारमाध्यम अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी आदी मान्यवरांचा समावेश आहे. त्याचबरोबर या दोन्ही कार्यक्रमांसाठी पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या निष्ठेने उपस्थित असतात.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी बाळशास्त्रींच्या स्मरण कार्याबरोबरच पत्रकारांच्या कल्याणार्थ अनेक उपक्रम राबवत असते. शासनदरबारी पत्रकारांच्या हक्कासाठी लढा देत असते. मात्र संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या कल्पनेतून सुरु झालेल्या महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या कार्याच्या प्रवासात बाळशास्त्रींचे पोंभुर्ले हे गाव व त्या ठिकाणी उभारलेले स्मारक हेच प्रमुख केंद्रबिंदू ठरले आहे. या कार्यामुळेच आता राज्यात सर्वत्र राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन, जांभेकर पुण्यतिथी कार्यक्रम होत आहेत हे ही नसे थोडके.
जांभेकर वंशजांची भावना….
‘कोरोना’ मुळे यंदा खंडीत झालेल्या परंपरेबद्दल पोंभुर्ले येथील बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज बाजीराव जांभेकर यांनी आपल्या भावना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांना संदेशाद्वारे कळविली आहे ती अशी, – सर, खूप वर्षापूर्वीची म्हणजे माझ्या लहानपणीची गोष्ट आठवतेय का तुम्हाला..? आम्हाला पहाटेच्या वेळी अचानक जाग आली ती सातारा येथून आलेल्या दोन व्यक्तींमुळे. त्या व्यक्ती होत्या रत्नपारखी सर व आडके सर. अख्खी रात्र जांभ्या कातळावर जंगलात जागून काढलेल्या त्या दोघांमुळेच जी वाडीची पर्यायाने गावाची पहाट झाली ती कायमची…… विद्याधर गोखले, नारायण सुर्वे, मनोहर जोशी, सदानंद मोरे, वसंत डहाके, प्रभाकर फणसीकर अशा अनेकांना आपण पोंभुर्ले दाखवलेत…. पुण्यभूमीची ओळख विश्व नकाशावर उमटवण्याचा आपला प्रयत्न अभिनंदनीय आहे…. इथेच बदलू लागल गाव मन आणि माणससुद्धा…. वर्तनाच रुपांतर परिवर्तनात होऊ लागल… समाजाकडून समाजपरीवर्तनाकडे पावल पडू लागली….. नवविचारांची नव लाट दुथडींना आपटू लागली.नव शिक्षित तरूण आत्मपरिक्षणाकडे वळू लागला…. या सार्यातल आपल स्थान निश्चित दिपस्तंभाप्रमाणे आहे आणि गावाच्या, आमच्या दृष्टीने तितकच अनन्यसाधारण आहे…… आज 28/29 वर्ष झाली आपण घेतलेल व्रत केव्हाच थांबल नाही. आपण आजारी असताना पण भावनेने सातत्याने येत होतात. अनेक वादळ आली. अनेक पावसाळे आले तरी आपली निष्ठा केव्हाच कमी नाही झाली…… सर, खरच आपण आला नाही अस पहिल्यांदाच होतय आणि आपली उपस्थिती नसताना आम्हाला आदरणीय कै.बाळशारत्री जांभेकरांना आदरांजली अर्पण करताना खूप खूप वाइट वाटतय. विचार आणि गैरसमजूती यामुळे वाद विवाद जरुर झाले असतील. पण माणूस म्हटल्यावर हे नकळत घडतच ना… पण मनातल प्रेम केव्हाच नाही कमी होत… त्याच प्रत्यंतर आज आलय सर… कोरोनाच हे मानव जातीवरच वादळ लवकर संपाव आणि आपण सगळे लवकर भेटावे हिच त्या वंदनीय जांभई देवी आणि आदरणीय बाळशारत्रींकडे प्रार्थना… आपण सार्यांनी काळजी घ्या…
शेवटचा मुद्दा
6 जानेवारीचा कार्यक्रम असला की 5 जानेवारीला फलटणहून सुमारे 350 किलोमीटर अंतराचा प्रवास करुन पोंभुर्ले येथे जाणे 6 जानेवारी रोजी राज्यस्तरीय पत्रकार दिनाचा कार्यक्रम पार पाडणे आणि याच पद्धतीने 16 मे रोजी फलटणहून निघून 17 मे रोजी बाळशास्त्रींना पुण्यतिथी दिनी अभिवादन करणे हे 28 वर्षांचे रविंद्र बेडकिहाळ व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे सातत्य आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी जांभेकर कुटूंबिय, पोंभुर्ले ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे सहकार्य मोलाचे असते. बाळशास्त्रींची पालखी, ढोल – ताशांच्या गजरात मर्दानी खेळांचे सादरीकरण स्थानिकांकडून मोठ्या उत्साहात पार पडते. यंदाचा 6 जानेवारीचा कार्यक्रम या ठिकाणी नुकताच पार पडला मात्र 17 मे च्या कार्यक्रमाला कोरोनाची बाधा आडवी आली आहे. गेल्या 27 वर्षात एकदाही पंढरीच्या वारीप्रमाणे ही पत्रकारांची पंढरी असलेली पोंभुर्ले वारी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीकडून चुकली नव्हती याची खंत निश्चितच कायम राहील.
***
– रोहित वाकडे,
संपादक, सा.लोकजागर.