जाधववाडी परिसर पूर्णतः लॉक डाऊन, कडक संचारबंदी जारी : प्रांताधिकारी

       फलटण दि. ९ : बिरदेवनगर (जाधववाडी) येथे करोना बाधीत आढळल्याने जाधववाडी ग्रामपंचायत क्षेत्रासह संजीवराजेनगर व भडकमकरनगर हा फलटण नगर परिषद क्षेत्रातील भाग कंटेंनमेंट झोन जाहीर करुन तेथे संपूर्णतः लॉक डाऊन, संचारबंदी जाहीर करण्यात आली असून तेथे आवश्यक, अत्यावश्यक सेवासह संपूर्ण व्यापार व्यवहार बंद करण्यात आल्याची माहिती इन्सीडन्ट कमांडर तथा प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
सोमवारी पासुन दिवसभर व्यापार व व्यवहार सुरु राहणार ९ ते ६
         कंटेंनमेंट झोन वगळून शहराचा उर्वरित भाग आणि कोळकी, ठाकुरकी ग्रामपंचायत क्षेत्र बफर झोन जाहीर करण्यात आला असून   तेथे संपूर्णतः लॉक डाऊन, संचारबंदी जाहीर केली नसली तरी अद्याप ३ व्यक्तींचे  अहवाल प्रलंबीत असल्याने फलटण शहरात यापूर्वी लावण्यात आलेले लॉक डाऊन संचार बंदी अधिक कडक करण्यात आल्याने दोन दिवस किराणा, औषधे, भाजीपाला वगैरे अत्यावश्यक सेवा खंडित झाल्या होत्या, आज (शनिवार) दुपारी ३ ते ६ या वेळेत बफर झोन मधील (फलटण शहर) औषध दुकाने सुरु राहणार आहेत, उद्या रविवार दि. १० रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत भाजीपाला, औषधे, दूध वितरण/दुकाने सुरु राहणार आहेत तर सोमवार दि. ११ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत अत्यावश्यक व आवश्यक सेवेची दुकाने सुरु राहणार आहेत, मात्र मॉल्स, व्यापारी संकुले, बाजार पेठा येथील अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी सांगितले.
कंटेंनमेंट झोन मधील सर्व कुटुंबांचे दररोज सर्वेक्षण
           कंटेंनमेंट जाहीर करण्यात आलेल्या जाधववाडी, संजीवराजेनगर, भडकमकरनगर या भागात ९९८ कुटुंबे असून १६ आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत त्यांची दररोज आरोग्य विषयक पाहणी करण्यात येत आहे, कंटेंनमेंट कालावधी २१ दिवसांचा राहणार असून या कालावधीत अगदी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तीही दररोज ये जा करु शकणार नाही, किंबहुना कोणालाही बाहेर जाता येणार नाही. आवश्यक सेवा घरपोहोच देण्याची व्यवस्था करण्यात येत असून त्यामध्ये उद्या पासून सकारात्मक बदल होतील असा विश्वास यावेळी प्रांताधिकारी जगताप यांनी व्यक्त केला आहे.
 अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रांताधिकाऱ्यांची पत्रकार परिषद
           फलटण शहर व परिसरातील करोना बाधीत क्षेत्र, तेथील सेवा सुविधांवरील निर्बंध, नागरिकांनी घ्यावयाची दक्षता, पोलीस, आरोग्य, महसूल, नगर परिषद प्रशासनाने केलेले नियोजन याबाबत माहिती देण्यासाठी तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत प्रांताधिकारी जगताप बोलत होते, यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रभारी तहसीलदार आर. सी. पाटील, नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी अमिता गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पोटे, उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. धवन उपस्थित होते.
जाधववाडी ग्रामविकास अधिकारी मदतीस सज्ज
          पेट्रोल पंपावरील सर्व निर्बंध मागे घेण्यात आल्याचे निदर्शनास आणून देत कंटेंनमेंट झोन मधील अत्यावश्यक सेवेसाठी नियुक्त केलेली व्यवस्था कोठे कमी पडत असेल तर जाधववाडी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी निंबाळकर यांच्याशी संपर्क केल्यावर ते त्याबाबत योग्य व्यवस्था करतील याची ग्वाही गटविकास अधिकारी अमिता गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केअर सेंटर मधील अधिकारी/कर्मचारी निवास व्यवस्था त्याच भागात करणार
        करोना केअर सेंटर मधील आरोग्य कर्मचारी यांना पुरेशी सुरक्षीतता दिली जात नाही का, तेथे आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध नाहीत का असा सवाल उपस्थित करीत सदर कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेले मास्क, हातमोजे, गॉगल, ओव्हरकोट वगैरे साधने वापरली जातात का असा सवाल उपस्थित करताच त्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी अनभिज्ञ असल्याचे यावेळी स्पष्ट झाले, करोना केअर सेंटर मधील आरोग्य कर्मचारी आपली ड्युटी संपल्यानंतर घरी जातात हे अयोग्य असून त्यांची त्या परिसरात निवासाची व्यवस्था करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्याबाबत व्यवस्था करण्याचे प्रांताधिकारी जगताप यांनी मान्य केले.
स्त्रावाचा नमुना घेणारे डॉक्टर हजर
       आपल्याकडे ३०० पीपीई किट उपलब्ध असून त्याच्या वापर व वितरणाबाबत तालुका आरोग्य अधिकारी माहिती देत असताना उप जिल्हा रुग्णालयातील स्त्री रोग तज्ञ डॉ. धुमाळ अचानक पत्रकार परिषदेत उपस्थित झाल्यानंतर उपस्थितांनी करोना केअर सेंटर मधील कर्मचारीच काय तेथील संशयीत रुग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेणारे विशेष प्रशिक्षीत डॉक्टर  सार्वजनिक ठिकाणी वावरत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर करोना केअर सेंटर मधील सर्व अधिकारी/कर्मचारी यांचे साठी त्या परिसरात निवास व्यवस्था करण्याचे, ७ दिवसानंतर त्यांना सुट्टी देऊन होम क्वारंटाइन करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी प्रांताधिकारी यांनी आरोग्य विभागाला दिले.
बायो मेडिकल वेस्ट गाडी चालक आरोग्य प्रमाणपत्र पाहणी करा : मागणी
      करोना केअर सेंटर आणि शहरातील विविध रुग्णालयातील बायो मेडिकल वेस्ट एक दिवसाआड जमा करण्यासाठी बारामती या बाधीत भागातून येणाऱ्या गाडीवरील चालक व अन्य कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे, त्याबाबत त्यांच्याकडील वैद्यकीय प्रमाणपत्राची पाहणी करुन त्यांना वैद्यकीय तपासणी करुन घेण्याबाबत सूचना करण्याचे यावेळी मान्य करण्यात आले.
बाधीत भागातून आलेल्यांना होम क्वारंटाइन केले जाते
          फलटण शहर व तालुक्यात पुणे मुंबई व अन्य बाधीत भागातून रीतसर परवानगी घेऊन आलेल्या व्यक्तींची तपासणी करुन त्यांना ७ दिवस होम क्वारंटाइन केले जाते, जे रीतसर परवानगी न घेता येतात त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येत असून त्यानंतर त्यांना ही होम क्वारंटाइन केले जात असल्याचे उप विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी स्पष्ट केले.
तालुका बॉर्डर सील : तपासणी नाकी कार्यान्वित
      तालुक्यात प्रवेशाच्या ठिकाणी तपासणी नाकी उभारण्यात आली असून त्याशिवाय अन्य सर्व रस्ते बंद करुन तेथे पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला असल्याचे निदर्शनास आणून देत दूध व भाजीपाला शहरी भागात घेऊन जाणाऱ्या गाड्यांचे चालक व त्यांच्या सहकाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाते, तसेच ते ड्युटीवरुन घरी येताच त्यांना होम क्वारंटाइन करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले.
फलटणकरांना सहकार्याचे आवाहन
      शहर व तालुक्यात करोना प्रादुर्भाव होणार नाही यासाठी शासन/प्रशासनाने राबविलेल्या विविध उपाययोजनांना नागरीकांनी योग्य साथ सहकार्य केल्यानेच गेले दीड दोन महिने आपण योग्य नियंत्रण राखले तरीही ६ करोना बाधीत व्यक्ती आढळल्या, अनेकांना क्वारंटाइन करावे लागले मात्र हे वाढणार नाही यासाठी आगामी काळात विशेष दक्षता घेण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले.
    
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!