मच्छिंद्रगड :- वाळवा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेला एक छोटेखानी किल्ला म्हणजेच मच्छिंद्रगड

मच्छिंद्रगड हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक छोटेखानी किल्ला आहे. इ.स. १६७६ च्या सुमारास स्वराज्यास बळकटी आणण्याकरता म्हणून छत्रपती शिवरायानी जी दुर्गशृंखला बांधली त्यापैकी मच्छिंद्रगड हा शेवटचा किल्ला होता. हा किल्ला कमळभैरवाच्या डोंगराशेजारील एका वाटोळ्या टेकडीवर उभा आहे.
मच्छिंद्रगडावर  जाण्यासाठी  जवळचे कराड किंवा इस्लामपूर येथून जाता येते. कराड ते रेठरे कारखाना बसने रेठरे कारखाना येथे उतरुन तिथून खाजगी वाहनाने मच्छिंद्रगडाच्या पायथ्याशी उतरतून गडावर जावे. 
छत्रपती शिवाजी महाराजांनी मच्छिंद्रगडाची उभारणी केली, पुढे इ.स. १६९३ मध्ये हा गड मोगलांच्या ताब्यात होता त्यावेळी या गडाचा किल्लेदार होता देवीसिंग. १२ नोव्हेंबर १६९३ रोजी औरंगजेब तख्त्तेखांवर बसून मच्छिंद्रगडाजवळ पोहोचला,तेव्हा मच्छिंद्रगडाचा किल्लेदार त्याच्या स्वागतास गड उतरून गेला, त्यावेळी औरंगजेबाने गडावरील तोफा उडवून देण्याचा हुकूम दिला व येथून पुढे तो वसंतगडास गेला.औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा गड परत मराठ्यांनी जिंकून घेतला. पुढे इ.स.१८१८ मध्ये कर्नल हेविट या इंग्रज अधिकाऱ्याने हा गड जिंकून घेतला.
मच्छिंद्रगड गावातून गडावर जाण्यासाठी पायऱ्यांची वाट केलेली असून या वाटेने साधारण अर्धा तास चढाई केल्यानंतर आपण मच्छिंद्रगडाच्या माथ्यावर येवून पोहोचतो.येथून एक पायवाट आपल्याला गडाच्या दक्षिण भागात असलेल्या मच्छिंद्रनाथ मंदिराकडे घेवून जाते. मंदिर प्रशस्त असून विविध शिल्पांनी सजविलेले आहे. येथे भाविकांचा नेहमी राबता असतो. येथून देवळाच्या पिछाडीस एक मोठी कोरडी विहीर आहे, नंतर तटाकडेने पुढे गेल्यावर जुन्या काळातील समाध्या दिसतात
मच्छिन्द्रगडाचा माथ्याचा आकार आटोपशीर असल्यामुळे गडफेरी साधारण तासाभरात पूर्ण होते, गडावर जुने अवशेष तसे फार कमी असून तटबंदीसुध्दा आता जुजबी स्वरूपात उरलेली आहे

.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!