वासोटा :- गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा म्हणून ओळखला जाणारा वासोटा किल्ला

वासोट्याला छत्रपती महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले आहे. वासोटा हा भारताच्या महाराष्ट्र  राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावळीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्‍न आहे.वासोटा हा गिरिदुर्गाबरोबरच वनदुर्गसुद्धा आहे. म्हणून याला ‘मिश्रदुर्ग’ म्हटले जाते.
सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे. या रांगेला समांतर अशी धावणारी घेरा दातेगडाची रांग घाटमाथ्यावर आहे.ही रांग महाबळेश्वरपासून दातेगडापर्यंत जाते. या दोन रांगाच्या मधून कोयना नदी वाहते. या जावळी खोर्‍यामधून वाहणार्‍या कोयना नदीवर हेळवाक येथे धरण बांधलेले आहे. या जलाशयाला शिवसागर म्हणतात. या शिवसागराचे पाणी वासोटा किल्ल्याच्या पायथ्याला स्पर्श करते. शिवसागराचे पाणी तापोळापर्यंत पसरलेले आहे.
सह्याद्रीची मुख्य रांग आणि शिवसागराचे पाणी यामधील भागात घनदाट अरण्य आहे. पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.
वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर ‘तुरुंग’ म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत
शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले, पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही. पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि ६ जून १६६० रोजी घेतला.
अफझलखाच्या वधानंतर शिवाजी महाराजांच्या दोरोजी या सरदाराने राजापुरावर हल्ला करून तेथील इंग्रजांना अफझलखानाच्या गलबतांचा पत्ता विचारला. त्यांनी सांगितला नाही म्हणून इंग्रजांच्या ग्रिफर्ड नावाच्या अधिकार्‍याला अटक केली व वासोट्यावर ठेवले. .सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी रेव्हिंग्टन, फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढील वर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. आठदहा महिन्यांच्या प्रखर झुंजीनंतर ताई तेलिणीचा पराजय झाला आणि १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
त्यासंबंधी एका जुन्या आर्येमध्ये वासोट्याचा गमतीचा उल्लेख आहे. तो असा —
श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;तेलिण मारी सोटा, बापू गोखल्या सांभाळ कासोटा.
वासोट्याला जाण्यासाठी  सातारा-कास-बामणोली असा गाडीरस्ता असून यावर रा.प. च्या बसेस आहेत. बामणोली हे गाव शिवसागर जलाशयाच्या पूर्व काठावर आहे. येथून वासोट्याकडे जाण्यासाठी शिवसागर ओलांडावा लागतो. त्यासाठी बामणोलीमध्ये लॉचेस उपलब्ध होतात. येथून वनखात्याच्या परवानगीने वासोट्याकडे जाता येते..
लॉचमधून साधारण ४० ते ५० मिनिटांच्या प्रवासानंतर आपण वासोट्याच्या जवळ पोहोचतो. पाण्याच्या फुगवट्यानुसार हा कालावधी कमी जास्त होतो. पायथ्याजवळ मेट इंदवाली नावाचे गाव होते. ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे. त्याचे अवशेष अजूनही दिसतात.
या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे. या मार्गाने काही अंतर गेल्यावर आपण पायथ्याला पोहोचतो. पायथ्याला ओढ्याकाठी मारुतीची मूर्ती आहे. येथूनच किल्ल्याची चढण आणि जंगल सुरू होते. सोबतच्या पाण्याच्या बाटल्या ओढ्यातून भरुन घेणे गरजेचे आहे. हा चढाईचा मार्ग दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामधून जातो. यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात. या जंगलात अनेक प्रकारची वन्य श्वापदे आहेत. श्वापदांत गवे आणि अस्वले प्रामुख्याने आहेत. त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते. कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो. त्यातल्या त्यात गव्यापासून आणि अस्वलापासून अंतर राखणे सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
अर्धा अधिक किल्ला चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते. ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते. सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते. कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायर्‍या लागतात. त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो.
गडाच्या प्रवेशद्वाराजवळून डावीकडील तटबंदीच्या कडेने जाऊन पूर्वेकडील बाजूस पोहोचल्यावर शिवसागर जलाशयाचा आणि अथांग पसरलेल्या जंगलाचा देखावा आपल्याला मुग्ध करतो. याच बाजूला पाण्याचे टाके आहे. हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे. पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे. येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो. जुन्या वासोट्याच्या बाबू कड्याचे तसेच पाताळवेरी गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खिळवून ठेवते. येथून परत पाण्याच्या टाक्यांकडे येऊन उत्तर टोकाकडे निघायचे. गडावरही सर्वत्र झाडीझाडोरा वाढला असल्यामुळे गडावरच्या वास्तू त्यात लुप्त झाल्या आहेत. वाटेवर मारुती मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष तसेच महादेव मंदिर आहे. तेथून पुढे उत्तरेकडील माची आहे. या माचीवर बांधकाम नाही. पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो. नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते. कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून न्याहाळता येतो.  येथून दिसणारे नागेश्वर शिखर फारच सुंदर दिसते. नागेश्वर सुळक्याच्या अलीकडे आणखी एक सुळका आहे त्याला तुळशी वृंदावन किंवा ठेंगा असे नाव आहे. पूर्व दिशेला ठोसेघर पठारावर दिसणाऱ्या पवन उर्जा प्रकल्पातील पवन चक्क्याही सौंदर्यात भरच घालतात.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!