मुंबई [ फलटण टुडे वृत्तसेवा ]दि 1 : परतीच्या वाटा खुल्या झाल्यानं मजुरांची घराकडे धाव
मजुरांसाठी स्पेशल श्रमिक ट्रेन सोडणार, पण रेल्वे आकारणार तिकीटाचे पैसे!
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाल, केशरी आणि हिरव्या विभागात जिल्ह्य़ांची विभागणी करण्यात आली असून टाळेबंदीसंदर्भात ३ मेनंतर काय करायचे याचा निर्णय परिस्थिती पाहून घ्यावा लागणार आहे. करोनाबाधित लाल विभागात शिथिलता देणे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नागपूरसारखे प्रतिबंधित क्षेत्रवगळता राज्यातील इतर भागांत टप्प्याटप्प्याने टाळेबंदीतून शिथिलता देण्यात येईल, असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांद्वारे संवाद साधताना राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करावयाचा होता. परंतु आजच्या परिस्थितीत ते शक्य नसल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, वडील बाळासाहेब ठाकरे, काका श्रीकांत ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात सहभाग घेतला होता. आज त्यांची, सेनापती बापट, शाहीर अमर शेख यांची आठवण येते. आज मला माझ्या आईचीही आठवण येत आहे.’’ हीरक महोत्सव असताना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लोकांचे आभार मानले. गिरणी कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवली. त्या सर्व ज्ञात-अज्ञात कामगारांना आपण मानाचा मुजरा करतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र करोनाशी लढत आहे. ही लढाई महाराष्ट्रच जिंकणार आहे. या विषाणूमुळे राज्य संकटात आले आहे, आर्थिक चाक रुतले आहे, रोजगार कमी झाला आहे, अडचणी वाढल्या आहेत, हे काही प्रमाणात खरे असले तरी प्रत्येक राज्य आणि राष्ट्राची खरी संपत्ती ही त्या राज्याची आणि राष्ट्राची जनताच असते. त्यामुळे ३ मेनंतर एकदम टाळेबंदी उठवणे योग्य होणार नाही. मुंबई-पुणे-नागपूरसारख्या लाल विभागात नियम कडक राहतील. राज्यातील इतर भागात प्रतिबंधित क्षेत्र वगळता टप्प्याटप्प्याने शिथिलता द्यावी लागेल. त्या ठिकाणी जनजीवन सुरळीत होत असताना पुन्हा गर्दी उसळू नये याची खबरदारी घ्यायची आहे; अन्यथा पुन्हा र्निबधांची वेळ येऊ शकते, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
* ‘त्यांना सुखरूप घरी पाठवू’
परराज्यातील मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना त्यांच्या राज्यात सुखरूपपणे पाठवण्यासाठी शिस्तबद्ध व्यवस्था केली जात आहे. परंतु त्यासाठी गर्दी करू नका, झुंडीने जमा होऊ नका, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. इतर राज्यांत अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांनाही परत आणले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यांतर्गत अडकलेल्या लोकांनाही जिल्हाधिकाऱ्यांना सांगून त्यांचीही त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
* जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक
शेती आणि शेतीसंबंधीचे व्यवहार, कृषी माल वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक यावर कोणतेही बंधन नाही. शेतकऱ्यांना बि-बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही. त्याबाबतची बंधने आपण उठवली आहेत. पण झुंबड उडाली तर बंधने घालावी लागतील, असा इशाराही मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला.