श्रीरामने गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे ८७ कोटी रुपयांचे पेमेंट केले

       फलटण दि.२८ : येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना चालविणाऱ्या श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग, फलटणने सन २०१९-२०२० या वर्षीच्या गळीत हंगामात सुमारे ३ लाख ४० हजार मे.टन ऊसाचे गाळप करुन गाळपास आलेल्या ऊसाचे प्रतिटन २५६३ रुपयांप्रमाणे संपूर्ण रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी दिली आहे.
१३८ दिवसात ३ लाख ४० हजार मे.टनांचे गाळप…
         यावर्षीचा गळीत हंगाम दि.२३ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरु होऊन दि.८ एप्रिल २०२० रोजी बंद करण्यात आला, १३८ दिवस सुरु असलेल्या या वर्षीच्या गळीत हंगामात ३ लाख ३९ हजार ६३२ मे.टन (३,३९,६३२.८११ मे.टन) ऊसाचे गाळप करुन ३ लाख ८० हजार ३८५ क्विंटल साखर उत्पादन केले आहे. हंगामात सरासरी साखर उतारा ११.२०% इतका राहिल्याचे श्रीराम जवाहरचे प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.मानसिंग पाटील यांनी सांगितले.
प्रतिटन २५६३ रुपयांप्रमाणे ८७ कोटी शेतकऱ्यांचे बँक खात्यावर जमा…
          गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे प्रतिटन २५६३ रुपयांप्रमाणे ८७ कोटी ४ लाख ७८ हजार ८९५ रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आल्याचे मा.श्री.मानसिंग पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
श्रीरामला पूर्ववैभवाप्रत नेण्यात उज्वल यश…
       श्रीराम सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्यानंतर अवसायानात काढण्याचे सल्ले देण्यात आले, तथापी श्रीराम बंद राहिला तर या तालुक्यातील ऊस उत्पादकांचे होणारे संभाव्य नुकसान टाळणे, त्याचबरोबर श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी उभारलेला आणि मा.आमदार श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांनी “संस्थापक चेअरमन” म्हणून सलग २५ वर्षे हा कारखाना चालविताना शेतकरी सभासदांच्या हिताला प्राधान्य देऊन चालविलेला हा कारखाना अवसायनात काढण्यास महाराष्ट्र विधानपरिषद सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांनी सहमती दिली नाही, त्यानंतर त्यांच्याच कल्पनेतून साखर व्यवसायातील जाणकार व अभ्यासू नेतृत्व मा.कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि.,हुपरी या सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा मा.मंत्री मा.श्री.कल्लाप्पा आवाडे (आण्णा) यांच्या सहकार्याने श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योग या संस्थेची स्थापना करुन त्या माध्यमातून गेल्या १० वर्षात श्रीरामला पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न यशस्वी होत असताना ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कामगार व ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी वगैरे त्याचप्रमाणे कारखान्याचे कामगार यांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झाल्याचे नमूद करीत गेल्या २/३ वर्षात या सर्व घटकांना नियमानुसार सर्व देऊन श्रीराम पूर्व वैभवाप्रत नेण्यात मा.कृषिमंत्री मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब, मा.मंत्री मा.श्री.कल्लाप्पा आवाडे (आण्णा), उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार, मा.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांचे मार्गदर्शन मा.आ.प्रकाश आवडे (दादा), मा.आ.दिपकराव चव्हाण, मा.श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे सहकार्याने यशस्वी झाल्याचे विद्यमान चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे, व्हा.चेअरमन मा.श्री.नितीन भोसले व संचालक मंडळाने अभिमानाने सांगितले आहे.
गाळप क्षमता वाढविण्याची घोषणा लवकरच…
            नीरा-देवघर व धोम-बलकवडी या दोन धरणांचे पाणी तालुक्यात उपलब्ध झाल्याने जिरायती पट्टा बागायती होण्याबरोबर बागायती पट्ट्यातही ओलिताखालील क्षेत्रात वाढ होत असल्याने वाढत्या ऊस क्षेत्राचे गाळप श्रीराम पूर्णपणे करु शकत नसल्याने त्यासाठी गाळप क्षमता वाढीसाठी विविध पर्यायावर चर्चा सुरु असून आगामी काळात ऊस उत्पादकांना दिलासा देणारा निर्णय निश्चित होईल याची ग्वाही मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी दिली आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!