छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करताना नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, गणेश शिरतोडे
फलटण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त शहरातील प्रमुख शिवजयंती मंडळांच्यावतीने प्रशासनाचे नियम पाळून अभिवादन करण्यात आले.
फलटण येथे परंपरेनुसार वैशाख शुद्ध द्वितीयेला शिवजयंती साजरी करण्याची प्रथा आहे. दरवर्षी शहरातील शिवजयंती उत्सव मंडळांच्यावतीने मोठ्या जल्लोषात जयंती उत्सव साजरा केला जातो. परंतू यंदा कोरोनामुळे देशासह राज्यावर मोठे संकट आले आहे. यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. अशावेळी लॉकडाऊनचे महत्व जपण्यासाठी रस्त्यावर गर्दी न करता यंदाची शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळ, मोती चौक शिवजयंती उत्सव मंडळ, रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळ, शुक्रवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळ, शिवाजी रोड शिवजयंती उत्सव मंडळ व फलटण शहर शिवजयंती उत्सव समिती यांच्या पुढाकाराने घेण्यात आला होता.
त्यानुसार या प्रमुख मंडळांच्यावतीने शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते रात्री 12 वाजता शिवाजी चौक येथील छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला. यावेळी पुरोहित राजू देशपांडे यांनी मंत्रपठण केले. त्यानंतर सकाळी 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमास मोती चौक शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष गणेश शिरतोडे, शिवाजीरोड शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष योगेश शिंदे, रविवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष विशाल पोतेकर, शक्रवार पेठ शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष प्रितम उर्फ आबा बेंद्रे उपस्थित होते.
जयंतीनिमित्त शिवरायांच्या अर्धपुतळ्या भोवती आकर्षक सजावट करण्यात आली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी आपापल्या घरीच शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करुन शिवजयंती साजरी करण्यात आली.